न्यूयॉर्क : जगातील सर्वात मोठ्या रंगीत हिऱ्यांपैकी एक असलेल्या ‘गोल्डन कॅनरी’ या हिऱ्याचा अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात डिसेंबरमध्ये लिलाव होईल. ३०३.१० कॅरेटच्या या पिवळ्या हिऱ्याची राखीव किंमत ठरलेली नाही. त्यामुळे त्यासाठीची बोली अवघ्या एक डॉलरपासून सुरू होईल. हा हिरा दीड कोटी अमेरिकी डॉलरला विकला जाईल, अशी अपेक्षा आहे. अमेरिकेतील लिलाव कंपनी सोथबीतर्फे हा लिलाव आयोजित करण्यात आला आहे. (वृत्तसंस्था)
भंगार म्हणून दिला होता फेकून १९८० च्या दशकाच्या प्रारंभी डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोत एक मुलगी काकांच्या घरामागे खेळत असताना एका ढिगाऱ्यात तिला हा हिरा सापडला होता. नजीकच्या एमआयबीए या सरकारी हिरा खाणीतील कामगारांना हा हिरा सापडला होता. मात्र, तो अवजड असल्याने त्यांनी तो टाकून दिला होता. ज्याला ते भंगार म्हणत होते तो ८९० कॅरेटचा रफ कट (पैलू पाडण्यापूर्वीचा खडबडीत) हिरा असेल, याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. तो जगातील सर्वात मोठ्या रफ हिऱ्यांपैकी एक होता. मुलीने हा दगड तिच्या काकांना दिला, त्यांनी तो स्थानिक हिरे व्यापाऱ्याला विकला.
कसे मिळाले नाव? हिरा पहिल्यांदा १९८४ मध्ये स्मिथसोनियन नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री येथे प्रदर्शित केला. नंतर कापून त्याचे छोटेमोठे १५ हिरे तयार करण्यात आले. सर्वात मोठा ४०७.४९ कॅरेटचा फॅन्सी खोल तपकिरी-पिवळा हिरा ‘अतुलनीय’ म्हणून ओळखला जात असे. शेवटी रंगाची खोली वाढवण्यासह रुपडे आकर्षक करण्यासाठी ‘अतुलनीय’वर पुन्हा प्रक्रिया करण्यात आली. यानंतर, तयार झालेल्या हिऱ्याला गोल्डन कॅनरी असे नाव देण्यात आले.
- गडद पिवळ्या रंगाचा व नाशपतीसारखा आकाराच्या हिऱ्याचा जगातील सर्वांत मोठ्या पॉलिश्ड हिऱ्यांमध्ये समावेश होतो. जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिकेने मानांकन दिलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा अंतर्गतरीत्या निर्दोष हिरा आहे.