पंजाबी गायक सिद्दू मुसेवाला याच्या हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रार याच्यावर गोळीबार झाल्याच्या वृत्ताने इंटरनेट विश्वात बुधवारी खळबळ उडाली होती. त्याच्य मृत्यूच्या बातम्या या अफवा असल्याचे अमेरिकेच्या पोलिसांनी स्पष्ट केले आहे. गोळीबारात मृत झालेला गँगस्टर गोल्डी नसून तो झेविअर गाल्डने असल्याचे सांगण्यात येत आहे.
अमेरिकेत गोळीबाराची घटना घडल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. यापैकी एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला तर दुसऱ्याला उपचारानंतर सोडून देण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. परंतू, मृत झालेला गोल्डी ब्रार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
एका ऑनलाईन चॅटमुळे गोल्डी ब्रारची हत्या झाल्याचा दावा केला जात होता. परंतु ते खरे नाही, असे फ्रेस्नोचे पोलीस अधिकारी विलिअम जे डुली यांनी म्हटले आहे. सोशल मीडियावर ही बातमी आगीसारखी पसरली, आम्हाला जगभरातून विचारणा करण्यात आली. आम्हाला ही अफवा कोणी सुरु केली याची माहिती नसल्याचे डुली म्हणाले.
मंगळवारी सायंकाळी वादानंतर फ्रेस्नोच्या फेअरमोंट आणि होल्ट अव्हेन्यूमध्ये दोन तरुणांवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यामध्ये गँगस्टर गोल्डी ब्रारची हत्या झाल्याचे सांगण्यात येत होते. ही बातमी भारतात आगीसारखी पसरली होती. परंतू, गोल्डी ब्रार अद्याप जिवंत असल्याचे समोर आले आहे.