ऑनलाइन लोकमत
पेशावर, दि. ९ - महागाईतून दिलासा मिळण्याची भारतीयांची प्रतिक्षा अद्याप कायम असली तरी भारतातील भाज्यांमुळे पाकिस्तानमध्ये 'अच्छे दिन' आल्याचे चित्र आहे. भारतातून आयात केल्या जाणा-या भाज्यांमुळे पाकिस्तानमधील महागाई घटली असून यामुळे पाकमधील 'आम आदमी'ला दिलासा मिळाला आहे.
पाकिस्तानमधील भाजी बाजारात यापूर्वी चीनमध्ये भाज्या आयात केल्या जात होत्या. पण आता भारतातून भाज्या आयात करण्याचे प्रमाण वाढल्याने पाकमधील भाजी बाजारातील महागाईचा फुगा फुटला आहे. भारतातून टॉमेटो आणि मटार मोठ्या प्रमाणात पाकमध्ये दाखल होत आहे. पाकमध्ये मटारची गोणी ३ हजार रुपयांमध्ये मिळायची. मात्र भारतातून आयात केलेला मटार यापेक्षाही स्वस्त दरात मिळू लागला आहे. यामुळे पाकमधील बाजारपेठेत मटारचे भाव थेट १२०० रुपयांपर्यंत गडगडले आहे. तर हीच अवस्था टॉमेटोचीही आहे. भारतातील टॉमेटोमुळे पाकमधील टॉमेटोचे दर कमी झाले आहे.आता तिथे ७०० रुपयांत २२ किलो आणि २०० रुपयात १२ किलो टॉमेटे मिळू लागले आहे. चालू हंगामात भारतातून आत्तापर्यंत भाज्यांचे २५ ट्रक आले असून त्यापैकी १५ ट्रक पेशावर आणि उर्वरित १० ट्रक काबूलमधील बाजारपेठेत पाठवण्यात आले आहे. भारतातील स्वस्त भाज्यांचा फटका पाकिस्तानमधील शेतक-यांना बसू लागल्याने स्थानिक शेतक-यांमध्ये नाराजी पसरली आहे,