लंडन, दि. 4 - केंब्रिजचे ड्यूक आणि डचेस म्हणजेच प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटन यांच्या घरात पुन्हा एकदा पाळणा हलणार आहे. अर्थात केट मिडलटन आई होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त केन्सिंग्टन पॅलेसने दिले आहे. 35 वर्षीय केट मिडलटनला तिसऱ्यांदा आई होणार आहे.केट मिडलटन-प्रिन्स विल्यम यांना तिस-यांना बाळ होणार असल्यानं राणीसह दोन्ही घरांतील नातेवाईकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. 4 वर्षांचा प्रिन्स जॉर्ज आणि 2 वर्षांची प्रिन्सेस चार्लोट यांच्यासोबत खेळण्यासाठी नवा पाहुणा येणार आहे. प्रिन्स जॉर्जने याच आठवड्यात लंडनमधील शाळेत प्रवेश घेतला. शाही कुटुंबातल्या गर्भारपणाची बातमी 12व्या आठवड्यात जाहीर करण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रथा आहे. मात्र गर्भावस्थेमुळे केटची तब्येत नाजूक असून, तिचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे ही बातमी वेळेपूर्वीच घोषित करण्यात आली. केन्सिंग्टन पॅलेसमध्ये केटची काळजी घेतली जात आहे.
दोन वर्षांपूर्वीच प्रिन्स विल्यम व 'डचेस ऑफ केंब्रिज' केट मिडलटन यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाली होती. पॅडिंग्टन येथील सेंट मेरी हॉस्पिटलमध्ये केट यांनी स्थानिक वेळेनुसार 8 वाजून 34 मिनिटांनी गोंडस मुलीला जन्म दिला होता. किंगस्टन पॅलेसतर्फे ही घोषणा करण्यात आली होती. केट मिडलटन व मुलीची प्रकृती उत्तम असल्याचेही सांगण्यात आले होते. दरम्यान राजघराण्यातील नव्या पाहुणीच्या जन्मावेळी ड्यूक ऑफ केंब्रिज प्रिन्स विल्यमही उपस्थित होते. केट मिडलटन यांना लिंडो विंगच्या त्याच सेंट मेरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, जिथे जुलै 2013मध्ये प्रिन्स जॉर्जचा जन्म झाला होता.