नवी दिल्ली - जगभरात कोरोना व्हायरस थैमान घालत असताना चीनमधून एक आनंदाची बातमी आली आहे. कोरोना व्हायरस बाधित पाच रुग्णांचा उपचार रक्ताने करण्यात आला आहे. कोरोना बाधित जुन्या रुग्णांचे रक्त या उपचारपद्धतीसाठी वापरण्यात आले आहे. उपचाराची ही पद्धत चीनमधील रुग्णालयात वापरण्यात आली असून त्यात यश आले आहे.
या पद्धतीने पाच रुग्णांवर उपचार करण्यात आला असून त्यापैकी तीन रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. दोन रुग्ण अद्याप रुग्णालयात असून त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे. अशा पद्धतीने उपचार करणाऱ्या डॉक्टरांनुसार, जुन्या रुग्णांच्या रक्ताने उपचार करण्याच्या पद्धतीने कोरोनाच्या नवीन रुग्णांना ठणठणीत करता येऊ शकते. या संदर्भातील वृत्त डेली मेल वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
चीनमधील ‘द शेनझेन थर्ड पिपल्स’ हॉस्पीटलने उपचाराच्या या पद्धतीचा रिपोर्ट २७ मार्च रोजी प्रकाशित केला होता. ज्या पाच कोरोना रुग्णांचा उपचार जुन्या कोरोना रुग्णांच्या रक्ताने करण्यात आला होता, ते रुग्ण ३६ ते ७३ वर्षांतील होते. या पद्धतीला डॉक्टरांच्या भाषेत कोवेलेसेंट प्लाझ्मा म्हटले जाते. या पद्धतीने आतापर्यंत अनेक आजार बरे करण्यात आले. या पद्धतीत नवीन रुग्णांच्या रक्तात कोरोनापासून ठीक झालेल्या रुग्णांचे रक्त टाकून प्रतिरोधक क्षमता वाढविण्यात येते.
या पद्धतीने रक्तात व्हायरसशी लढण्यासाठी अँटीबॉडी तयार होते. ही अँटीबॉडी व्हायरसशी लढून त्यांना नष्ठ करते. बारा दिवसांपूर्वी ‘द शेनझेन थर्ड पिपल्स’ हॉस्पीटलमध्ये पाच रुग्ण कोरोना बाधित आढळून आले होते. यामध्ये तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश होता. त्यांच्यावर जुन्या रुग्णांच्या रक्ताने उपचार करण्यात आला.
रुग्णालयाचे उपनिर्देशक लिऊ यिंगजिया यांनी सांगितले की, आम्ही ३० जानेवारीपासूनच कोरोना व्हायरस मुक्त झालेल्या रुग्णांचा शोध सुरू केला होता. त्यांना शोधून त्यांचे रक्ताचे नमूने घेण्यात आले. त्यातून प्लाझ्मा काढून तो स्टोर करण्यात आला. नवीन रुग्णांना हेच प्लाझ्मा डोस देण्यात आले. आमच्या या मुळ पद्धतीचा फायदा जगभरात होईल अशी आशा यिंगजिया यांनी व्यक्त केली. तसेच ही पद्धत विश्वासपात्र असल्याचे त्यांनी नमूद केले.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आरोग्य आणीबाणी कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. माईक रियान यांनी चीनच्या डॉक्टरांचे या प्रयोगासाठी कौतुक केले आहे.