वॉशिंग्टन : आकाशातील सौरमालेत पृ्थ्वीसोबत गुरु, शुक्र, शनी आदी अनेक ग्रह आहेत. यांच्याभोवती परिभ्रमण करणारे चंद्रही आहे. एकट्या शनीभोवती तर १४६ चंद्र आहेत परंतु पृथ्वीभोवती एकच चंद्र आहे. परंतु एका खगोलीय घटनेमुळे पृथ्वीला दोन महिन्यांसाठी का असेना आणखी एक मिनी चंद्र लाभणार आहे.
अमेरिकन अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटीने प्रकाशित केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. या चंद्राचे पहिले दर्शन ७ ऑगस्ट २०२४ रोजी झाले.
अहवाल काय सांगतो?
अहवालात खगोल संशोधकांनी म्हटले आहे की, अवकाशात कोणतीही वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत आल्यानंतर घोड्याच्या नालेप्रमाणे मार्गाचा अनुसरण करीत जात असते.
तिचा वेग पृ्थ्वीच्या सूर्यमालेतील परिभ्रमणाच्या वेगाच्या तुलनेत कमी असतो. पण ही वस्तू पृथ्वीभोवती परिभ्रमण पूर्ण न करताच ठरलेल्या मार्गाने निघून जाते. या घटनेला ‘मिनीमून’ असे म्हणतात. संशोधकांना खगोल अभ्यासासाठी ही एक दुर्मिळ संधी असते.
नेमका कशामुळे घडणार हा ‘चमत्कार’?
खरेतर ही घटना पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पाहायला मिळणार आहे. २९ सप्टेंबर ते २५ नोव्हेंबर या काळात हा लघुग्रह पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली येईल.
प्रभावाखाली असण्याच्या काळात लघुग्रह पृ्थ्वीभोवती काही काळ फिरेल परंतु परिभ्रमण पूर्ण करणार नाही. २५ नोव्हेंबर नंतर पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून सू्र्याभोवती आधीप्रमाणे परिभ्रमण सुरु करेल.
किती मोठा असेल अन् कसा दिसेल हा चंद्र?
काही काळासाठी पृथ्वीवरून दिसणारा हा पाहुणा’ चंद्र हुबेहूब आपल्या चंद्राप्रमाणे नसेल. त्यापेक्षा कितीतरी पट लहान असणार आहे.
हा एका लघुग्रहाच्या रुपात असणार आहे. २०२४पीटी५ असे त्याचे नाव असणार आहे. हा लघुग्रहाचे सर्वात पहिल्यांदा दर्शन ७ ऑगस्ट २०२४ रोजी झाले होते.
याचा व्यास १० मीटर इतका आहे. डोळ्यांनी किंवा टेलिस्कोपने पाहिले तरी मिनीमून तितका स्पष्टपणे दिसू शकणार नाही.
याआधी असे घडले आहे का?
प़थ्वीवर याआधीही असे मिनी मून आले आहेत. १९८१ आणि २०२२ मध्येही अल्पकाळासाठी अशा घटना घडल्या आहेत.
आकार लहान असल्याने आणि वेग अधिक असल्याने मिनीमून ओळखताही येत नाहीत.