वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने जगभरात चाहूल दिलेली असताना आता एक चांगली बातमी हाती येत आहे. कोरोनाचा कहर असलेल्या अमेरिकेत येत्या 12 डिसेंरला पहिली लस टोचली जाण्याची शक्यता आहे. रविवारी अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार 11 किंवा 12 डिसेंबरपासून कोरोना (Covid-19) लसीकरण सुरु केले जाईल असे म्हटले आहे.
अमेरिकेची औषध निर्माता कंपनी फायझर आणइ जर्मनीची सहकारी कंपनी बायोएनटेकने कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी अमेरिकेच्या एफडीएकडे अर्ज केला होता. यावर एफडीएची 10 डिसेंबरला बैठक होणार आहे. अमेरिकेचे कोरोना व्हायरस लसीकरणाचे प्रमुख डॉक्टर मोनसेफ स्लाउ यांनी सांगितले की, आमच्या योजनेला मंजुरी मिळाली की 24 तासांच्या आत ही लस लसीकरण करण्याच्या ठिकाणी पोहोच केली जाणार आहे. यामुळे मंजुरी मिळाल्याच्या एक किंवा दोन दिवस नंतर ही लस टोचली जाईल.
फायझर औषध क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. अमेरिकेत मुख्यालय असलेली फायझर बायोएनटेक या जर्मन कंपनीसोबत कोरोनावरील लस तयार करत आहे. तिसऱ्या टप्प्यात लसीची ९४ कोरोना रुग्णांवर चाचणी घेण्यात आली. त्यापैकी ९० टक्के रुग्णांवर लसीचा सकारात्मक परिणाम दिसल्याची माहिती फायझरनं दिली आहे. लसीची चाचणी करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाचं किमान एक लक्षण होतं.
फायझरच्या लसीची चाचणी अद्याप संपलेली नाही. मात्र ही लस तिसऱ्या टप्प्यात ९० टक्के यशस्वी ठरल्यानं अपेक्षा उंचावल्या आहेत. बहुतांश रुग्णांवर सकारात्मक परिणाम दिसल्यानं फायझरची लस लवकरच बाजारात दाखल होऊ शकते. कोरोनामुळे आतापर्यंत जगात १२ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक देशांमध्ये आता कोरोनाची दुसरी लाट आल्यानं धोका अधिक वाढला आहे.
कोरोनापासून मुक्तीसाठी संपूर्ण जगाच्या नजरा वैज्ञानिकांकडे लागल्या आहेत. यासंदर्भात बोलताना, अमेरिकन अन्न व औषध प्रशासनाने (FDA) म्हटले आहे, की त्यांची व्हॅक्सीन कमिटी आणीबाणीजन्य परिस्थितीतील वापराच्या मंजूरीसाठी मागण्यात आलेल्या परवानगीवर विचार करण्यासाठी 10 डिसेंबरला भेट घेईल. संघटनेचे प्रमुख स्टेफेन हन म्हणाले," लोकांमध्ये कोरोना लशीप्रति विश्वास निर्माण करण्यासाठी चर्चा आणि पारदर्शकता अत्यंत आवश्यक आहे, असे एफडीएला वाटते."