Cancer Vaccine Russia: कर्करोग म्हणजे कॅन्सर हा एक दुर्धर आजार आहे. यावर औषधे शोधण्याचा प्रयत्न गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु आहे. याच कर्करोगावर आता महत्त्वाची अपडेट मिळाली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले आहे की, त्यांचा देश लवकरच कर्करोगाची लस तयार करणार आहे. रशियन शास्त्रज्ञ लक्षणीय प्रगती करत आहेत आणि कर्करोगाची लस तयार करण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. ती लस लवकरच रुग्णांसाठी उपलब्ध होईल.
पुतीन नक्की काय म्हणाले?
"आम्ही कर्करोगाच्या लसी आणि नवीन पिढीतील इम्युनोमोड्युलेटरी औषधांच्या निर्मितीच्या अगदी जवळ आलो आहोत. मला आशा आहे की लवकरच या औषधांच्या पद्धती वैयक्तिक स्तरावर प्रभावीपणे वापरल्या जातील," असे पुतिन यांनी एका टेलिव्हिजन निवेदनात म्हटले आहे. प्रस्तावित लस नेमकी कोणत्या महिन्यात उपलब्ध होईल आणि ते कोणत्या प्रकारचे कर्करोग टाळतील हे अद्याप पुतीन यांनी स्पष्ट केलेले नाही. ही लस लोकांपर्यंत कशी पोहोचवली जाईल याबाबतही त्यांनी परिस्थिती स्पष्ट केलेली नाही.
गेल्या काही वर्षांपासून, अनेक सरकार आणि कंपन्या कर्करोगावरील लस विकसित करण्यासाठी काम करत आहेत. गेल्या वर्षी यूके सरकारने 2030 पर्यंत 10,000 रूग्णांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने कर्करोगाच्या उपचारांसाठी क्लिनिकल चाचण्या घेण्यासाठी जर्मनी-आधारित बायोएनटेकशी करार जाहीर केला. फार्मास्युटिकल कंपन्या Moderna आणि Merck & Co. प्रायोगिक कॅन्सरची लस तयार करत आहेत, ज्याच्या अभ्यासानुसार तीन वर्षांच्या उपचारानंतर त्वचेचा कर्करोग असलेल्या मेलेनोमाची पुनरावृत्ती होण्याची किंवा त्याने दगावण्याची शक्यता कमी होईल. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV)चा सामना करण्यासाठी सध्या सहा परवानाकृत लसी आहेत, ज्यामुळे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासह (cervical cancer) अनेक कर्करोग होतात, तसेच यकृताचा कर्करोग होणाऱ्या हिपॅटायटीस बी (HBV) विरुद्धही लस बनू शकते.