या देशानं घेतली रशियाला धडा शिकवण्याची शपथ, उचललं मोठं पाऊल; भारतासाठी आनंदाची बातमी!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 07:52 PM2023-05-05T19:52:31+5:302023-05-05T19:54:01+5:30
युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेसह जगातील अनेक देशांनी रशियावर विविध प्रकारचे निर्बंध लादले आहेत. पण...
युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेसह जगातील अनेक देशांनी रशियावर विविध प्रकारचे निर्बंध लादले आहेत. मात्र, रशियाही झुकायला तयार नाही. आपल्या अर्थव्यवस्थेवर कुठल्याही प्रकारचे संकट येऊ नये, म्हणून रशिया अनेक देशांना कमी दराने तेल विक्री करत आहे. गेल्या एका वर्षात तेल विक्रीच्या बाबतीत सौदी अरेबियाला रशियाकडून मोठे आव्हान मिळाले आहे.
रशिया ज्या देशांना कमी दरात तेलाची विक्री करतो, त्यांतील अधिकांश देश आशिया खंडातील आहेत. कमी दरात तेलाची विक्री करून रशियाने आशिया खंडातील अनेक देशांना आपल्या बाजूने वळवले आहे.
युक्रेन युद्धापूर्वी, भारत रशियाकडून 1 टक्क्याहूनही कमी तेल आयात करत होते. मात्र आता भारताची अधिकांश तेलाची आयात रशियाकडून होते. यावरून, कमी दराने तेलाची विक्री करण्याच्या रशियाच्या निर्णयाने सौदी अरेबियाला केवढा मोठा धक्का बसला असेल, याचा अंदाज लावला जाऊ शकतो. या बाबतीत इराक, सौदी अरेबिया आणि यूएई सारखे देशही मागे पडले आहेत. काही दिवसांपूर्वी रशियाने पाकिस्तानलाही कमी दरात तेल देण्याचा निर्णय घेतला आहे.
सऊदीनं घेतला असा निर्णय -
रशियाचा वाढता दबदबा लक्षात घेत, सौदी अरेबियानेही आता आशियातील देशांसाठी गेल्या चार महिन्यांत पहिल्यांदाच तेलाच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबिया हा जगातील सर्वात मोठा तेल निर्यात करणारा देश आहे. सौदी अरेबियाची तेल कंपनी अरामकोने म्हटल्यानुसार, अरब लाइट ग्रेडच्या जूनमध्ये लोड होणाऱ्या तेलाच्या किंमती मे महिन्याच्या तुलनेत प्रति बॅरल 25 सेंटने कमी करण्यात आल्या आहेत.
सर्वात महागडे कच्चे तेल सऊदीचे -
एप्रिल 2023 मध्ये, भारताच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने एक आकडेवारी जारी केली होती. त्यानुसार, भारताने फेब्रुवारी महिन्यात रशियाकडून 76.92 डॉलर प्रति बॅरल दराने तेल खरेदी केले होते. तर इराकमधून 76.19 डॉलर प्रति बॅरलने तेलाची खरेदी करण्यात आली होती. याच वेळी, भारताला सौदीकडून सर्वात महाग, म्हणजेच 87.66 डॉलर प्रति बॅरल दराने तेल मिळाले होते.