मुंबई: देशात 1 जुलै 2017 पासून वस्तू आणि सेवा कर लागू झाला. सहा टप्प्यांमध्ये लागू करण्यात आलेला हा कर अनेकदा वादग्रस्त ठरलाय. या कराच्या अंमलबजावणीवरुनही मोदी सरकारवर टीका झाली होती. मलेशियात हाच कायदा 2015 मध्ये लागू झाला. हा कायदा लागू करणाऱ्या मलेशियाच्या पंतप्रधानांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागलाय. याआधी कॅनडामध्ये जीएसटी लागू करणाऱ्या सरकारलाही सत्ता गमवावी लागली होती. मलेशियातील सार्वत्रिक निवडणुकीत विविध वादांमुळे चर्चेत राहिलेल्या पंतप्रधान नजीब रझाक यांच्यासमोर 92 वर्षांच्या महातिर मोहम्मद यांचं आव्हान होतं. बुधवारी सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये महातिर मोहम्मद यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. त्यांनी रझाक यांचा पराभव केला. रझाक यांनी 1 एप्रिल 2015 मध्ये जीएसटी लागू केला होता. काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत रझाक यांनी जीएसटी लागू करण्याचा निर्णय अतिशय कठीण होता, असं म्हटलं होतं. 'जीएसटी लागू केल्यानंतर अनेक वस्तू आणि सेवा महाग होतील, याची कल्पना होती. मात्र देशहितासाठी हा निर्णय घेतला,' असं रझाक यांनी म्हटलं होतं. 92 वर्षांच्या महातिर यांनी रझाक यांच्या बॅरिसन नॅशनल आघाडीला निवडणुकीत पराभूत केलं. महातिर यांनी निवडणुकीत रझाक यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. याशिवाय त्यांनी सत्तेवर येताच जीएसटी रद्द करण्याचं आश्वासनही दिलं होतं. मलेशियाच्या जनतेनं जीएसटी हटवण्यासाठी महातिर यांना कौल दिल्याचं मानलं जातंय. चीननं मलेशियात केलेल्या गुंतवणुकीचा पुनर्विचार करण्याची घोषणा महातिर यांनी केलीय.
तीन वर्षांपूर्वी लागू केला होता जीएसटी; 'या' पंतप्रधानांना पत्कारावा लागला पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2018 2:55 PM