गुगलच्या एका माजी कर्मचाऱ्याने कंपनी आणि एचआर विभागावर गंभीर आरोप केले आहेत. महिला बॉसमुळे त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचा आरोप त्याने केला आहे. याविरोधात तो न्यायालयातही गेला आहे.
रेयान ओलोहान असे या कर्मचाऱ्याचे नाव असून त्याच्यासोबत २०१९ मध्ये चेल्सी, मॅनहटनमध्ये कंपनीच्या एका पार्टीवेळी विचित्र घटना घडली होती. त्याची बॉस टिफनी मिलरने त्या रात्री त्याला खास प्रस्ताव दिला होता. तो त्याने धुडकावला होता. ओलोहान हा ४८ वर्षांचा आहे. गुगलची प्रोग्रामेटिक मीडिया डायरेक्टर टिफनी मिलर हिने डिनरवेळी त्याच्या शरीराला अश्लिल स्पर्श केला होता. तसेच तिने त्याची स्तुती देखील केली होती.
या दरम्यान तिने तिचे वैवाहिक आयुष्य एवढे चांगले नसल्याचे देखील त्याला सांगितले होते. ओलोहानचे एका आशियाई महिलेशी लग्न झाले होते. हे मिलरला माहिती होते. ती देखील आशियाई होती. यामुळे ओलोहानला आशियाई महिलांमध्ये इंटरेस्ट आहे, असे तिला वाटत होते. यामुळे तिने हे कृत्य केल्याचा आरोप त्याने केला आहे.
बॉसचा इरादा समजताच ओलोहानने लगेचच तिला झटकले आणि पुढच्याच आठवड्यात तिच्याविरोधात गुगलच्या एचआर विभागाकडे तक्रार केली. धक्कादायक बाब म्हणजे एचआर विभागाने तिच्यावर कोणताही कारवाई केली नाही. जर महिलेने पुरुषाविरोधात तक्रार केली तरच चौकशी केली जाईल असे सांगितले गेले. यानंतर टिफनी मिलरने खोट्या तक्रारी केल्याचा आरोप केला. पुन्हा २०२२ मध्ये तिने शरीरसुखाची मागणी केली. तेव्हाही मी ठोकरली त्यामुळे माझ्यावर अनेक आरोप करत मला नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचे या कर्मचाऱ्याने केलेल्या दाव्यात सांगितले आहे.