वॉशिंग्टन : १ एप्रिल आला की चेष्टेखोर लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. या दिवशी गंमतीने दुसऱ्यांना मूर्ख बनविण्यास काहीच हरकत नाही. कोणतेही नुकसान किंवा हानी पोहचणार नाही अशी चेष्टा चालेल; पण एका मर्यादेपर्यंतच. नाही तर गुगलसारखे तोंडघशी पडावे लागते.एप्रिल फुल दिनानिमित्त गुगलने ‘जीमेल’ यूजर्सची मजा घेण्याकरिता ‘सेंड अँड माईक ड्रॉप’ हा नवीन आॅप्शन उपलब्ध करून दिला. ‘डिस्पेकेबल मी’ चित्रपटातील गोंडस आणि महाचेष्टेखोर ‘मिनियन्स’चा यामध्ये उपयोग करण्यात आला. यानुसार तुम्ही एखाद्याला मिनियन्सचे अॅनिमेशन असलेले ईमेल पाठवून त्याच्याशी कायमचा संवाद थांबवू शकता. समोरचा व्यक्ती तुम्हाला पुन्हा रिप्लाय करू शकणार नाही.इथपर्यंत सर्व ठीक होते. परंतु या ‘सेंड अँड माईक ड्रॉप’ आॅप्शनचे बटण ईमेल पाठविण्याच्या (सेंट) बटणाशेजारी ठेवण्यात आल्याने सगळा गोंधळ उडाला. अनेक लोकांनी महत्त्वाच्या ईमेल्सला रिप्लाय देताना मजेशीर अॅनिमेशन पाठविले. एका यूजरला तर गुगलच्या या प्रँकमुळे हातची नोकरी गमवावी लागली. (वृत्तसंस्था)गुगलच्या सपोर्टपेज वर लोकांनी धडाधड तक्रारी पोस्ट केल्या. सोशल मीडियावरदेखील नेटिझन्समध्ये नाराजीचा सूर दिसून आला. एक्सओएक्सओ फेस्टिव्हलचा संस्थापक अँडी बायोने ट्विट केले की, मी देखील चुकून महत्त्वाच्या ईमेलमध्ये मिनियन्सचे अॅनिमेशन पाठवले. मला आश्चर्य वाटते की, गुगल इतक्या बेजबाबदारपणे वागेल. यामुळे होणाऱ्या नुकसानीला गुगलच जबाबदार आहे. प्रकरण गरम होताना पाहून गुगलेनेदेखील ही सुविधा मागे घेतली आणि स्वत:ची चुक मान्य केली.
गुगलला पडले ‘एप्रिल फुल’ महाग
By admin | Published: April 02, 2016 3:48 AM