कोरोना काळापासूनच गुगल काही कारणांमुळे चीनमधील आपल्या सेवा कमी करताना दिसत आहे. यातच आता गुगलने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. गुगलने चीनमध्ये आपली गुगल ट्रान्सलेट सर्व्हिस बंद केली आहे. यापूर्वी गुगलने (Google) आपल्या प्रोडक्ट्सचे मॅन्यूफॅक्चरिंग चीनमधून दुसऱ्या देशात हलवले आहे. याचाच एक भाग म्हणून गूगलने आपल्या पिक्सल फोनच्या (Google pixel) निर्मितीसाठी चीन ऐवजी भारताला प्राधान्य दिले.
गुगलने चीनमध्ये बंद केली सर्व्हीस -गुगलने चीनमध्ये आपली ‘गुगल ट्रान्सलेट’ सर्व्हीस बंद केली आहे. ‘गुगल ट्रान्सलेट’ ही गुगलने चीनमध्ये सुरू केलेल्या काही निवडक सेवांपैकी एक होती. याच बरोबर, चीनमध्ये ‘गुगल ट्रान्सलेट’ अॅपवर आणि वेबसाइटवर युजर्सना एक सर्वसाधारण ‘सर्च बार’ आणि ‘लिंक’ दिसते, जी क्लिक केल्यानंतर त्यांना हाँगकाँगमध्ये उपलब्ध कंपनीच्या वेबपेजवर घेऊन जाते. या वेबपेजवर चीनमध्ये बंदी घालण्यात आली आहे. चीनच्या अनेक युजर्सनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये शनिवारपासूनच ‘गूगल ट्रान्सलेट’ सेवा बंद असल्याचे म्हटले आहे. गूगल क्रोम ब्राउझरमधील ट्रान्सलेशन फीचरही आता चीनमध्ये काम करत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
यामुळे बंद करण्यात आली सर्व्हीस -यासंदर्भात, गुगलने एक निवेदन जाहीर करत म्हटले आहे, की चीनमध्ये गुगल ट्रान्सलेटचा कमी वापर होत असल्याने ही सेवा बंद करण्यात आली आहे. मात्र, चीनमध्ये नेमके किती युजर्स या सेवेचा वापर करत होते, हे यात स्पष्ट करण्यात आलेले नाही.