मनामा - पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर आहेत. मोदींना बहरीनचे राजे हमाद बिन इसा बिन सलमान अल खलिफा यांच्या हस्ते 'द किंग हमाद ऑर्डर ऑफ दि रेनेसान्स' हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. भारत आणि बहरीन यांच्यातील द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल शनिवारी (24 ऑगस्ट) मोदींचा सन्मान करण्यात आला आहे. मोदी यांच्या बहरीन भेटीनिमित्त तेथे विविध आरोपांखाली शिक्षा भोगत असलेल्या 250 भारतीय कैद्यांना माफी देण्यात आली आहे. त्यामुळे बहरीनच्या जेलमधून 250 भारतीयांची सुटका होणार आहे.
पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने एक ट्वीट करून याबाबत माहिती देण्यात आली आहे. 'दया आणि मानवतेच्या भावनेने बहरीन सरकारने विविध आरोपांखाली शिक्षा भोगत असलेल्या 250 भारतीय कैद्यांना माफ केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी या निर्णयाबाबत बहरीनच्या नेत्यांचे आभार मानले आहेत.' असं ट्वीट करण्यात आले आहे. 'बहरीनचे राजे आणि त्यांच्या शाही कुटुंबाच्या या निर्णयाचे स्वागत आणि त्यांचे आभार' असं ट्वीट मोदी यांनी केलं आहे. पुरस्कारामुळे माझा सन्मान झाला तसेच भारतीयांच्या वतीने मी हा पुरस्कार नम्रपणे स्वीकारतो. हा संपूर्ण भारताचा सन्मान आहे. बहरीनबरोबर भारताचे कायमच व्यापारी संबंध राहिले आहेत. बहरीन साम्राज्य व भारत यांच्यातील घनिष्ठ व मैत्रीपूर्ण संबंधांना मिळालेली ही मान्यता आहे असं देखील मोदी यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदींनी बहरीनमधल्या भारतीयांना संबोधित केलं आहे. ते म्हणाले, भारताच्या पंतप्रधानाच्या स्वरूपात बहरीनमध्ये येण्याची संधी मिळाली, असं तुमचं प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे. भारतातली विविधता हीच त्याची शक्ती आहे. मी श्रीनाथजींच्या मंदिरात जाऊन तुमच्या देशाच्या समृद्धी आणि शांतीसाठी प्रार्थना करणार आहे. हे पूर्ण क्षेत्रातील जुनं मंदिर आहे. गल्फ देशांतही कृष्ण कथा ऐकण्याची परंपरा आजही अबाधित आहे. भारतीयांचं भगवान कृष्णाप्रति विशेष प्रेम आहे. बहरीनच्या प्रगतीत भारतीयांचं मोठं योगदान आहे. आपलं नातं फक्त सरकारांचं नाही, तर संस्कारांचं आहे.
मला पाच हजार वर्षं जुन्या संबंधांना पुन्हा चालना द्यायची आहे. बहरीनमधल्या भारतीयांना भेटण्यासाठीच मी आलो आहे. बहरीनमधल्या भारतीय समुदायाला न्यू इंडियासाठी आमंत्रित करत आहे. बहरीनबरोबर भारताचे कायमच व्यापारी संबंध राहिले आहेत. पुढे ते म्हणाले, तुम्ही तुमच्या भारतातल्या कुटुंबीयांना विचारल्यास तेसुद्धा तुम्हाला भारतातल्या वातावरणात आता बदल झाल्याचं सांगतील. तुम्हाला भारताला बदललेलं पाहायचं आहे की नाही?, भारत आता प्रगतीची एक एक शिखरं पादाक्रांत करत चालला आहे.
भारताचं चांद्रयान 2 सुद्धा 7 सप्टेंबर रोजी चंद्रावर उतरणार आहे. या प्रगतीमुळे जगभरात भारताच्या अवकाश मोहिमेचीच चर्चा आहे. भारतानं एवढ्या कमी खर्चात चंद्रावर यान कसं काय पाठवलं, यानं सगळं जगच आश्चर्यचकित झालं आहे. भारतानं येत्या 5 वर्षांत अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरची करण्याचं लक्ष्य ठेवल्याचंही मोदींनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितलं आहे.