इस्लामाबाद : देशाचा कारभार हाकण्यासाठी पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ सरकारकडे पैसा नाही, असे पंतप्रधानइम्रान खान यांनी शुक्रवारी म्हटले. ‘आपण बदलले पाहिजे म्हणून कदाचित देवानेच हा पेचप्रसंग निर्माण केलेला असावा’, असेही खान म्हणाले.पूर्वीच्या सरकारने संपत्ती निर्माण करण्याऐवजी तोट्यात जाणारे प्रकल्प केले, असा ठपका खान यांनी नोकरशहांच्या कार्यक्रमात बोलताना ठेवला. ‘डॉन’ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार इम्रान खान म्हणाले, देशाच्या लोकसंख्येपैकी बहुतांश हे तरुण असून, ते नोकरीच्या शोधात आहेत. कर्जाच्या सापळ्यातून सरकारला बाहेर पडणे गरजेचे आहे, असे सांगून खान म्हणाले की, आम्ही आणि आमच्या देशाने बदलण्याची गरज आहे. सरकार जेव्हा लोकांची जबाबदारी स्वीकारते तेव्हा लोकांनीदेखील सरकार आपले असल्याचे मान्य केले पाहिजे. चौकशीदरम्यान कोणत्याही अधिकाऱ्याला अपमानित केले जाऊ नये, असे आदेश मी नॅशनल अकाऊंटिबिलिटी ब्युरोला दिले होते. भलेही नोकरशहांना मी किंवा माझा पक्ष आवडत नसलो तरी ते जर देशासाठी काम करीत असतील, तर त्यांच्या पाठीशी मी उभा राहीन, असे त्यांनी स्पष्ट केले.
देशाचा कारभार हाकण्यास सरकारकडे पैसा नाही : इम्रान खान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 2:52 AM