All Party Meeting on Bangladesh Situation : शेख हसीना यांनी मंगळवारी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडला. शेख हसीना यांनी लष्करी हेलिकॉप्टरमधून देश सोडून भारतात आश्रय घेतला. आरक्षणावरून दोन महिने सुरु असलेल्या गदारोळानंतर बांगलादेशात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालीय. बांगलादेशच्या या संकटावर भारताचे बारीक लक्ष आहे. बांगलादेशातल्या परिस्थितीबाबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित होते. यावेळी सरकारने बांगलादेशातील भारतीयांबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.
बांगलादेशातील आरक्षणविरोधी हिंसक आंदोलनांदरम्यान पंतप्रधान शेख हसीना यांनी अचानक राजीनामा देऊन देश सोडल्याने तेथे अराजकतेची स्थिती निर्माण झाली आहे. बांगलादेशच्या संकटावर चर्चा करण्यासाठी भारत सरकारने सकाळी १० वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी या बैठकीत सदस्यांना बांगलादेशातील परिस्थितीबाबत माहिती दिली. यानंतर सरकार संसदेत याविषयी महत्त्वाची देणार आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, हिंसाचारग्रस्त देशातील १२,०००-१३,००० भारतीयांना बाहेर काढण्यासाठी बांगलादेशातील परिस्थिती इतकी चिंताजनक नव्हती असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी सांगितले . बांगलादेशातील सरकारविरोधी निदर्शने आणि ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्यामुळे शेख हसिना यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडल्यानंतर सरकार बांगलादेशातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, असेही एस जयशंकर म्हणाले.
"सुमारे ८,००० भारतीय विद्यार्थी हे बांगलादेशातील हिंसाचारानंतर भारतात परतले आहेत. सोमवारी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन भारतात पळून आलेल्या हसिना यांच्याशी सरकारने थोडक्यात चर्चा केली आहे. सरकारला हसीना यांला त्यांच्या भविष्यातील योजना ठरवण्यासाठी थोडा वेळ द्यायचा आहे,” असे जयशंकर यांनी सांगितले.
यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यासाठी एक दीर्घकालीन रणनीती असली पाहिजे, ज्यामध्ये बांगलादेशमध्ये निवडणुका होईपर्यंत अंतरिम सरकारचे शासन असेल, असे म्हटलं. यावर बोलताना एस जयशंकर म्हणाले की, "यासंदर्भात परिस्थिती विकसनशील आहे. जे सरकार येईल ते भारताशी योग्य व्यवहार करेल."