धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे, असे सिगारेटच्या बॉक्सवर लिहिलेले तुम्ही पाहिलेच असेल. पण सिगारेट ओढणारे या गोष्टीकडे अजिबात लक्ष देत नाहीत. उलट ते एखादं टॉनिक घेत असल्यासारखे बिनदिक्कतपणे सिगारेट ओढतात. ही लोक अधूनमधून सिगारेट ओढणारे असतात, तर काहींना सिगारेटचे इतके व्यसन असते की, ते चेन स्मोकर बनतात. धूम्रपान केल्याशिवाय त्यांना अन्न पचत नाही आणि चहा प्यायला जात नाही.
विशेष म्हणजे हे व्यसन असे आहे की, अनेक वेळा ऑफिसचे काम सोडूनही लोक सिगारेट ओढायला जातात. दरम्यान, सध्या जगभरात अशाच एका व्यक्तीची चर्चा होत आहे, जो ऑफिसच्या वेळेतही भरपूर सिगारेट ओढत असे, पण कंपनीने त्याला असा धक्का दिला की आता तो कामाच्या वेळी सिगारेट ओढण्यासाठी उठू शकणार नाही. हे प्रकरण जपानमधील ओसाका येथील आहे.
ऑडिटी सेंट्रल नावाच्या वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला सिगारेट ओढण्याचे इतके व्यसन होते की तो कामाच्या दरम्यान ब्रेक घेऊन सिगारेट ओढण्यासाठी बाहेर पडत असे. त्याने आत्तापर्यंत किती सिगारेट ओढल्या आहेत याची मोजदाद केली असता लोकांना धक्काच बसला. या व्यक्तीने 14 वर्षांत 4500 हून अधिक सिगारेट ओढल्या होत्या आणि तेही ऑफिसमध्ये काम करताना वारंवार ब्रेक घेत. अशा परिस्थितीत त्याच्यावर कडक कारवाई करण्यात आली आहे.
रिपोर्टनुसार, कर्मचारी संचालक स्तरावरील अधिकारी आहे. एकूण 14 वर्षात त्यांनी कामाच्या वेळेत 355 तास 19 मिनिटांचा ब्रेक फक्त आणि फक्त सिगारेट ओढण्यासाठी घेतला आहे. त्यामुळे आता या 61 वर्षीय व्यक्तीवर जवळपास 9 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. एवढेच नाही तर पुढील 6 महिन्यांसाठी त्यांच्या पगारातील 10 टक्के रक्कमही कापली जाणार आहे.
दरम्यान, ड्युटी ऑफ डिवोशनचे उल्लंघन केल्यामुळे या व्यक्तीला ही 'शिक्षा' देण्यात आली आहे. खरंतर, ओसाका येथे कामावर असताना सिगारेट ओढणे हे स्थानिक सार्वजनिक सेवा कायद्याच्या विरोधात असल्याचे म्हटले जाते. हा नियम 2019 मध्ये लागू करण्यात आला होता.