लॉस एंजिल्स : हेवीवेट बॉक्सिंगमध्ये तीन दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणाऱ्या जगभरातील चाहत्यांचा ‘बॉक्सिंग आयडॉल’ मोहम्मद अली यांची उतारवयात सुरू असलेली झुंज अखेर थांबली. रिंगमध्ये भल्याभल्यांना पराभवाचा ठोसा मारणारे मोहम्मद अली यांना मात्र वयाच्या ७४व्या वर्षी आजारासमोर हार मानावी लागली. अली यांच्या परिवाराचे प्रवक्ते बाब गुनेल यांनी सांगितले की, अली यांना आठवडाभरापूर्वी श्वसनाच्या विकारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी त्यांची प्रकृती खालावली. पार्किन्सनमुळे त्यांना श्वास घेण्यास अडथळा येत होता. यामुळे ते कमजोर झाले होते. गेल्या काही वर्षांत त्यांना अनेकदा रुग्णालयात न्यावे लागले होते. २0१४मध्ये त्यांना न्यूमोनिया झाला होता. २0१५मध्येही किडनीसंबंधी तक्रारीमुळे काही दिवस रुग्णालयात काढावे लागले होते. बॉक्सिंग कारकिर्दीत अनेकवेळा प्रतिस्पर्ध्यांचे ठोसेही खावे लागल्यामुळे पार्किन्सन आजाराने त्यांना घेरले होते असे म्हटले जाते. जागरूक नागरिकही...गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी सार्वजनिकरीत्या बोलणे टाळले होते. काही कार्यक्रमांत ते आपल्या परिवारामार्फत किंवा प्रवक्त्यामार्फत आपले म्हणणे मांडत असत. त्यांची बॉक्सिंग रिंगमधील कामगिरी तर कमालीची होतीच; शिवाय मानव अधिकाराबाबतही ते जागरूक होते. अमेरिकेचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत मुस्लिमांना प्रवेशावर बंदी घालण्याचे जे वक्तव्य केले होते, त्याच्यावर त्यांनी टीका केली होती.
एका महान बॉक्सरची झुंज थांबली
By admin | Published: June 05, 2016 4:15 AM