लॉस एंजिलिस : जगप्रसिद्ध गोल्फपटू टायगर वूड्स एका भीषण कार अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. वूड्स यांच्या कारला मंगळवारी लॉस एंजिलिसमध्ये अपघात झाला. यात टायगर वुड्स यांच्या पायाला इजा झाली असून ते गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, असून जखमी पायावर शस्त्रक्रिया कर ण्यात आल्याची माहिती लॉस एंजलिस काउंटी शेरीफ विभागाने दिली आहे.
लॉस एंजिलिसमधील रोलिंग हिल्स एस्टेट्स आणि रँचो पालोस वेरिड्सच्या दरम्यान सकाळी ७.१२ वाजता ही अपघाताची घटना घडली. वक्राकार असलेल्या ब्लॅकहॉर्स रोडवरून जात असताना टायगर वूड्स यांची भरधाव कार अनियंत्रित झाल्यानंतर दुभाजकावर आदळली आणि पलटली. कारमध्ये वूड्स एकटेच होते. त्यांना विंडोशिल्डमधून बाहेर काढण्यात आले.
अपघातात कारचे प्रचंड नुकसान झाले असून, वूड्स यांनाही गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या शरीरातून अल्कोहोल किंवा इतर अंमली द्रव्याचा गंध येत नव्हता. कारचा वेग किती होता, याची नेमकी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. वूड्स यांच्या अपघातग्रस्त कारची दृश्येही व्हायरल झाली आहेत. या दृश्यात कारचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झालेला असून, एअरबॅगही दिसत आहेत. हेलिकॉप्टरमधून हे छायाचित्र घेण्यात आले आहे.
उजव्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया
जखमी वूड्सच्या उजव्या पायावर डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. वूड्स फाऊंडेशनने दिलेल्या माहितीनुसार, शस्त्रक्रियेदरम्यान वूड्सच्या पायात रॉड्स, स्क्रू आणि पिन्स टाकण्यात आल्या. दीर्घ शस्त्रक्रियेनंतर वूड्स शुद्धीवर आले असून ते उपचारास प्रतिसाद देत आहेत. हार्बर वैद्यकीय केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी अनिश महाजन यांनी वूड्स यांच्या उजव्या पायाचे हाड मोडले असून पोटरीच्या हाडात रॉड टाकण्यात आल्याचे सांगितले. पायाच्या आणि घोट्याच्या जखमांसाठी स्क्रू तसेच पिन्स टाकण्यात आल्या.