बीजिंग - चीनकडून ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेला घेण्यासाठी पॅसिफिक महासागरातील १० देशांसोबत संरक्षण करार करण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. पॅसिफिक देशांच्या दौऱ्यावर गेलेले चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांना रिकाम्या हाती परतावे लागले आहे. पॅसिफिक देशांनी चीनसोबत व्यापार आणि संरक्षण करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. वांग यी यांनी फिजी येथे १० देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांसोबत बैठक घेतली. मात्र या बैठकीत चीनसोबत संरक्षण आणि आर्थिक करारांवर कुठल्याही प्रकारचं एकमत होऊ शकलं नाही.
चीन या १० देशांसोबत मुक्त व्यापार, पोलीस सहकार्य आणि आपत्तीव्यवस्थापनाबाबत करार करण्यास इच्छुक होता. फिजीचे पंतप्रधान फ्रँक बेनिमरामा यांनी सांगितले की, पॅसिफिक देश आपल्या भूमिकेबाबत एकजूट आहेत. त्यांनी सांगितले की, नेहमीप्रमाणे आम्ही आपल्या १० देशांमध्ये नव्या प्रादेशिक कराराबाबत चर्चेमधून एकमत निर्माण करू. फिजीच्या पंतप्रधानांनी हेही सांगितले की, ते चीनसोबत वातावरणीय बदल आणि उत्सर्जनाबाबत ठोस आश्वासनाची अपेक्षा बाळगत आहेत.
या दरम्यान, फिजीमध्ये चीनचे राजदूत किआन बो यांनी सांगितले की, काही पॅसिफिक देशांनी बीजिंगच्या व्यापक प्रस्तावामधील काही तरतुदींवर आक्षेप घेतला होता. त्यांनी सांगितले की ज्या देशांसोबत आमचे राजकीय संबंध आहेत, त्या १० देशांसाठी सर्वसंमत्ती आहे. मात्र निश्चितपणे काही विशेष मुद्द्यांवर काही चिंता आहे. चिनी राजदूतांनी सांगितले की, आम्ही आपली स्थिती लवकरच स्पष्ट करणार आहोत. त्यांनी सांगितले की, आम्ही आपल्या मित्रांसोबत सातत्याने संपर्कात आहोत.