युक्रेनला मोठे यश! रशियन सैन्याकडून मोक्याची जागा घेतली ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 10:49 AM2023-08-29T10:49:38+5:302023-08-29T10:56:36+5:30
Russia-Ukraine War: रशियाच्या एका खासगी सैन्य प्रमुखाचा काही दिवसांपूर्वीच विमान अपघातात संशयास्पद मृत्यू झाला आहे. या वॅगनार ग्रुपच्या मदतीनेच रशिया युक्रेनमध्ये विसंबून आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या दीड वर्षापासून युद्ध सुरु आहे. दीड दिवसात संपेल असे वाटणारे युद्ध आणखी काही वर्षे तरी चालण्याची शक्यता आहे. रशियाला युक्रेनने युरोप आणि अमेरिकेच्या बळावर तगडा लढा दिला आहे. इतिहासाच्या पानांवर या युद्धाचे किस्से सुवर्णाक्षरांत लिहिले जातील, असे हे युद्ध सुरु आहे. अशातच युक्रेनने आणखी एक भूभाग रशियाच्या जबड्यातून हिसकावून घेतला आहे.
रशियाच्या एका खासगी सैन्य प्रमुखाचा काही दिवसांपूर्वीच विमान अपघातात संशयास्पद मृत्यू झाला आहे. या वॅगनार ग्रुपच्या मदतीनेच रशिया युक्रेनमध्ये विसंबून आहे. या दोन्ही सैन्यांच्या ताब्यात असलेला भाग पुन्हा मिळविण्यासाठी युक्रेन सैन्य जिवाची बाजी लावत आहे. युक्रेनच्या सैन्याने सोमवारी दावा केला की त्यांनी रशियन सैन्यापासून आग्नेयेला असलेले रोबोटिन शहर मुक्त केले आहे.
दोन महिन्यांहून अधिक काळ संघर्षानंतर रशियन सैन्याला ढकलण्यात यश आले आहे. सैन्याने गेल्या आठवड्यात रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या रोबोटिन गावावर पुन्हा कब्जा मिळविला आहे. रशियन सैनिक शोधण्यासाठी मोहीम सुरू केली आणि संपूर्ण भागावर नियंत्रण प्रस्थापित केल्याचे व्हिडीओत म्हटले आहे.
रशियन सैन्याचा ताबा असलेल्या भागाकडे जाणाऱ्या मोक्याच्या रस्त्यावरील हा भाग आहे. यामुळे रशियन सैन्याची पुढील रसद तोडणे शक्य होणार आहे. या संपूर्ण प्रदेशातील रस्ते आणि रेल्वे नेटवर्कवर रशियाचे नियंत्रण आहे. यामुळे ही मोहिम अत्यंत महत्वाची होती. युक्रेनच्या लष्कराने टोकमाक परत मिळवले तर तो रशियन सैन्याला मोठा धक्का बसणार आहे.