ढाका - २००४ साली झालेल्या ग्रेनेड हल्ल्याप्रकरणी बांगलादेशमधील एका न्यायालयाने १९ जणांना फाशी तर माजी पंतप्रधान बेगम खलिदा झिया यांच्या मुलासह अन्य १९ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. २१ ऑगस्ट २००४ रोजी शेख हसिना यांना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला होता. या हल्यात २४ जणांचा मृत्यू झाला होता. तर ३०० जण जखमी झाले होते. या हल्ल्यात शेख हसीना या बचावल्या असल्या तरी त्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला होता. या प्रकरणी चाललेल्या न्यायालयीन सुनावणीनंतर आज दोषींना शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षा सुनावण्यात आलेल्यांमध्ये माजी गृहराज्यमंत्री लुत्फोजमा बाबर यांच्यासह १९ जणांचा समावेश आहे. तर लंडनमध्ये निर्वासित म्हणून राहत असलेले बीएनपीचे वरिष्ठ उपाध्यक्ष तारिक रहमान यांच्यासह १९ जणांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे. बीएनपीच्या नेतृत्वाखालील सरकारमधील प्रभावी गटाने हरकत उल जिहाद अल इस्लामी या दहशतवादी संघटनेला हाताशी धरून हा हल्ला करण्याची योजना आखली होती, असे तपासात निष्पन्न झाले होते. या हल्ल्यानंतर बांगलादेशच्या राजकारणात मोठे बदल झाले. हा हल्ला झाला तेव्हा शेख हसिना या विरोधी पक्षनेत्या होत्या. तर बेगम खलिदा झिया पंतप्रधानपदी होत्या.