एकीकडे पाकिस्तानमध्ये एससीओ बैठकीमुळे पुढील पाच दिवसांसाठी लग्न कार्य आदी गोष्टींवर बंदी असताना दुसरीकडे बलुचिस्तानमध्ये कोळशाच्या खाणीवर मोठा हल्ला करण्यात आला आहे. ग्रेनेड आणि बॉम्बफेक झाल्याने कोळसा खाणीतील सुमारे २० जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी पहाटे हा हल्ला झाला आहे.
बलुचिस्तानातील डुकी भागात जुनैद कोळसा कंपनीच्या खाणींवर हत्यारबंद लोकांनी भीषण हल्ला केला. पोलीस अधिकारी हुमायू खान यांनी सांगितले की, शुक्रवारी पहाटे शस्त्रास्त्रे घेऊन आलेल्या लोकांच्या गटाने खाणीवर हल्ला केला. यावेळी खाणीमध्ये रॉकेट आणि ग्रेनेड हल्ले करण्यात आले. जिल्हा हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत २० मृतदेह आणण्यात आले आहेत. तर सहा जण जखमी आहेत. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणी स्वीकारलेली नाही.
गेल्या काही काळापासून बलुचिस्तान लिबरेशन आर्मी चीन आणि पाकिस्तानच्या संयुक्त प्रकल्पांवरील कर्मचाऱ्यांवर हल्ले करत आहे. यामुळे चीनने नुकतेच आपले ४०० कर्मचारी माघारी बोलविले आहेत. तसेच चीन आपले सैन्य बलुचिस्तानमध्ये तैनात करणार आहे. चीनचे अब्जावधी रुपयांचे प्रकल्प पाकिस्तानात सुरु आहेत. या प्रकल्पांना आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्यात येणार आहे.