पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने स्वीडनमधून पृथ्वीची विनाशाकडे होत असलेली वाटचाल रोखण्यासाठी काही तरी करा, अशी साद घातली आहे. तिचे हे आंदोलन आता जगभर पसरले असून, 20 सप्टेंबरपासून सात दिवस विविध देशांमध्ये ‘फ्रायडे फॉर फ्यूचर’चा जागर केला जात आहे. संयुक्त राष्ट्र संघात हवामान बदल थांबवण्यासाठी हवामान कृती परिषद सुरू आहे. 16 वर्षीय ग्रेटाने या परिषदेत आपला संताप व्यक्त केला आहे. पर्यावरण संवर्धनासंदर्भात तुमच्या पोकळ शब्दांनी आमची स्वप्नं आणि बालपण हिरावून घेतल्याचं तिने म्हटलं आहे.
संयुक्त राष्ट्रांनी न्यूयॉर्क येथे हवामानातील बदलाच्या संकटावर मात करण्यासाठी हवामानविषयक परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील नेत्यांनी या परिषदेला हजेरी लावली. पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने या परिषदेच्या सुरुवातीला आपली भूमिका मांडली. 'पर्यावरण संवर्धनासंदर्भात तुमच्या पोकळ शब्दांनी आमची स्वप्नं आणि बालपण हिरावून घेतलं. पण तरीही तुम्ही आशेने येता. तुमची हिंमत कशी होते?' असा प्रश्न ग्रेटाने जगभरातील नेत्यांना विचारला आहे.
स्वीडनमधील ग्रेटाच्या ‘फ्रायडे फॉर फ्यूचर’च्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्रातील अनेक शाळकरी मुलांनी देखील रॅली काढून पर्यावरणाचा जागर केला आहे. या सात दिवसांच्या जागरात पहिल्याच दिवशी मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि कोल्हापुरात अनेक शाळांनी सहभाग नोंदविला होता. हवामान बदलाच्या संकटाला गांभीर्याने न घेणाऱ्या प्रत्येकाने जागे व्हावे, अशी हाक या विद्यार्थ्यांनी दिली आहे.
हवामान बदलाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी जागतिक स्तरावर जनचळवळ उभी राहिली पाहिजे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (23 सप्टेंबर) म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांनी न्यूयॉर्क येथे आयोजित केलेल्या हवामानविषयक परिषदेत ते बोलत होते. पॅरिसमधील परिषदेत झालेल्या हवामानविषयक करारातील तरतुदींशी प्रामाणिक राहून भारताने 175 गिगावॅट इतके बिगरजीवाश्म इंधन उत्पादित करण्याचे लक्ष्य राखले आहे अशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात केली होती. तो धागा पकडून मोदी म्हणाले की, बिगरजीवाश्म साधनांतून 2022 सालापर्यंत 175 गिगावॅट अपारंपारिक उर्जेची निर्मिती करण्यात येईल व हे प्रमाण कालांतराने 400 गिगावॅटपर्यंत वाढवण्यात येईल. नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, हवामान बदलाच्या संकटावर मात करायची असेल तर त्यासाठी सध्या सुरू असलेले प्रयत्न तोकडे आहेत हे आपण आधी मान्य केले पाहिजे. चर्चा करण्याचे दिवस संपले, आता कृती करण्याची वेळ आली आहे.