Crime News : एका नवरदेवाने लग्नाच्या दिवशीच पाहुण्यांसमोर नवरीची बेदम मारहाण करत हत्या केली. नवरदेवाला संशय होता की, त्याची पत्नी त्याला दगा देत आहे. याप्रकरणी त्याला 18 वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. ही घटना रशियातील एका गावातील आहे.
25 वर्षीय स्टीफन डोलगिखने त्याच्या होणाऱ्या पत्नीची मारहाण करत हत्या केली. त्यानंतर 36 वर्षीय ओक्साना पोलुडेंटसेवाचा मृतदेह एका खड्ड्यात फेकला होता. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात घडलेल्या या घटनेसाठी स्टीफनला नुकतीच शिक्षा सुनावण्यात आली.
'द मिरर'नुसार, स्टीफनने गावातील घरात लग्न समारंभ आयोजित केला होता. यादरम्याने त्याने नवरी ओक्सानाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली होती. तिचे केस पकडून तिला खेचत नेलं आणि डोक्यावरही अनेकदा वार केला. या हल्ल्यात ओक्सानाचा जीव गेला. हा सगळा प्रकार बघून लग्नात आलेले पाहुणे घाबरले होते. त्यांनी लगेच पोलिसांना सूचना दिली. ज्यानंतर स्टीफनला अटक करण्यात आली. त्यावेळी तो नशेत होता.
या केसचा तपास करत असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, स्टीफन आधीही हत्येच्या केसमध्ये तुरूंगात गेला होता. जेव्हा तो तुरूंगात होता तेव्हा त्याची मैत्री ओक्सानासोबत झाली होती. ओक्सानाला वाटलं होतं की, स्टीफनला सुधारण्यात ती त्याची मदत करू शकते. त्यामुळे तो सुटेपर्यंत तिने त्याची वाट पाहिली. त्यानंतर ती लग्नासाठीही तयार झाली.
पण लग्नाच्या दिवशीच स्टीफनने ओक्सानाची हत्या केली होती. रिपोर्टनुसार, स्टीफनने हत्येचा गुन्हा कबूल केला. कथितपणे लग्नात आलेल्या एका पाहुण्याबाबत त्याला ईर्ष्या वाटत होती. त्याला वाटत होतं की, ओक्साना पाहुण्यासोबत चुकीच्या पद्धतीने वागत आहे. ज्यामुळे तो संतापला आणि त्याने हे कृत्य केलं.