अलोटेनान्गो, ग्वाटेमाला- ग्वाटेमालामधील फ्युएगो ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे ग्वाटेमालामधील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. उद्रेकानंतर आतापर्यंत 73 लोकांचे प्राण गेले असून 200हून अधिक लोक बेपत्ता आहेत.
ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर त्याच्याजवळच्या एस्क्युइंटला शहरामध्ये भीतीमुळे लोकांनी आपली वाहने घेऊन सुरक्षीत जागी पळण्याचा पर्याय निवडला मात्र यामुळे शहरामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली आणि राखेत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यामध्ये अधिकच अडथळे आले.
या ज्वालामुखीमधून मोठ्या प्रमाणात गरम चिखलासारखा प्रवाह, राख आणि दगड आजूबाजूच्या प्रदेशात पसरले आहेत. राखेच्या आणि धुळीच्या आवरणाखाली गेलेल्या येथिल खेड्यांमधून लोकांना बाहेर काढणे मोठे आव्हानाचे काम झाले आहे. तसेच नक्की किती लोक येथे अडकले आहेत याचीही कल्पना तेथिल प्रशासनाला आलेली नाही.
3,763 मी उंचीच्या या ज्वालामुखी पर्वतामधून रविवारी सकाळी मोठ्या प्रमाणात राख आणि दगड बाहेर पडू लागले. धूर आणि राखेच्या मोठ्या लोटांमुळे परिसरातील दृश्यताही कमी झाली. या ज्वालामुखीमुळे 17 लाख लोकांचे जीवन विस्कळीत झाले असून 3000 लोकांना परिसरातून बाहेर काढण्यात आले आहे. ग्वाटेमालाचे राष्ट्रपती जिमी मोरालेस यांनी या परिसराला भेट दिली आणि तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.