लंडन : इंग्लंडमधील लीड्स शहरातील गुरुद्वारा व मशिदीला एकाच वेळी आग लावण्याचा प्रकार मंगळवारी घडला. विद्वेषातून हे कृत्य करण्यात आले असावे, असा पोलिसांचा कयास आहे.लीड्समधील हार्डी स्ट्रीटवर असलेली जामिया मशिद अबु हुरैरा या मशिदीच्या मुख्य प्रवेशद्वाराला मंगळवारी पहाटे आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर काही मिनिटांतच लेडी पिट लेनवरील गुरु नानक निष्काम सेवक जथा गुरुद्वाराच्या प्रवेशद्वाराला आग लावण्यात आली. स्थानिक रहिवाशांनी तातडीने अग्निशमन दल व पोलिसांना पाचारण करुन आग विझवली. पेट्रोल ओतून आग लावली असावी असा संशय आहे.यासंदर्भात पोलिस अधिकारी रिचर्ड होल्मेज यानी सांगितले की, गुरुद्वारा व मशिदीची वास्तू एकमेकांपासून जवळच्या अंतरावर आहेत. या प्रार्थनास्थळांना आगी लावण्याचा प्रकार विद्वेषातून झाला असावा, असा कयास आहे. या स्थळांच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. (वृत्तसंस्था)
इंग्लंडमधील गुरूद्वारा, मशिदीला लावली आग;विद्वेषातून गैरकृत्य केल्याचा कयास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 5:14 AM