काठमांडू - भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांत चीनच्या पूर्णपणे काह्यात गेलेल्या नेपाळमध्येभारतविरोधी वातावरण तयार होताना दिसत आहे. चीनमधील सत्ताधारी पक्ष आणि चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांमध्ये नुकतीच बैठक झाली. त्यानंतर आता नेपाळमधील गोरखा नागरिकांनी भारतीय लष्करामध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन नेपाळमध्ये करण्यात येत आहे. त्यातच गोरखा सैनिकांनी भारताकडून चीनविरोधात लढाई लढू नये, अशी चिथावणी नेपाळमधील एका बंदी घातलेल्या संघटनेने दिली आहे.
बंदी घातलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळचे नेते बिक्रम चंद यांनी गोरखा नागरिकांना भारतीय लष्करात दाखल होण्यापासून रोखण्यात यावे, असे आवाहन नेपाळ सरकारला केले आहे. गलवान खोऱ्यात भारतीय जवानांना वीरमरण आल्यानंतर भारत आणि चीनमधील तणाव वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर भारताने गोरखा रेजिमेंटमधील नेपाळी सैनिकांना सुट्ट्या रद्द करून ड्युटीवर परतण्याचे आदेश दिले आहेत. याचा अर्थ भारत नेपाळी नागरिकांना चीनच्या विरोधात उतरवू इच्छित आहे, असे पक्षाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.
गोरखा जवानांना भारताद्वारे तैनात करण्यात येणे हे नेपाळच्या परराष्ट्र धोरणाविरोधात आहे. नेपाळ एक स्वतंत्र देश आहे. तसेच एका देशाच्या सैन्यात काम करत असलेल्या जवानांना दुसऱ्या देशाविरोधात उतरवणे योग्य नाही, असेही या पक्षाने आपल्या पत्रकात म्हटले आहे. नेपाळमधील हा पक्ष भूमिगत असला तरी डाव्या विचारांच्या लोकांमध्ये या पक्षाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळालेला आहे.
भारतीय लष्करामध्ये गोरखा रेजिमेंटला अनन्यसाधारण महत्त्व असून, या रेजिमेंटच्या जवानांनी अनेक युद्धात देशासाठी मर्दुमकी गाजवली आहे. पर्वतीय प्रदेशामध्ये गौरखा जवान मोठ्या प्रमाणात तैनात असतात. तसेच पर्वतीय भागात गोरखा जवानांपेक्षा चांगली लढाई कुणी लढू शकत नाही, असे सांगितले जाते. केवळ भारतच नाही तर ब्रिटनच्या सैन्यदलामध्येसुद्धा गोरखा सैनिक तैनात आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या