न्युयॉर्क : अमेरिकन नागरिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी ट्रम्प यांनी एच-1 बी व्हिसाच्या नियमांमध्ये कठोर बदल करण्याचे जरी ठरविले असले तरीही तेथील अॅपलसारख्या आघाडीच्या तब्बल पाच डझन कंपन्यांना सुरंग लागण्याची शक्यता आहे. यामुळे या कंपन्यांच्या सीईओनी ट्रम्प यांना पत्र लिहून व्हिसाच्या नियमांमध्ये बदल झाल्यास अमेरिकेचा आर्थिक विकास खुंटण्याची भीती व्यक्त केली आहे.
ट्रम्प प्रशासनाला पत्र लिहिणाऱ्यांमध्ये अॅपलचे कार्यकारी अध्यक्ष टीम कुक, जेपी मॉर्गनचे जेमी डीमन आणि पेप्सिकोच्या इंदिरा नुई यांचा समावेश आहे. हे पत्र अमेरिकेच्या उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या बिझनेस राऊंड टेबल या संघटनेने बुधवारी पाठविले आहे. पत्रामध्ये उच्च कौशल्यधारकांबाबतच्या नियमांच्या बदलांबाबत उल्लेख करण्यात आला आहे.
सरकार सध्या अमेरिकेत नोकरीसाठी वास्तव्यास येणाऱ्या नागरिकांच्या नियमांबाबत विचार करत आहे. असे बदल करण्यापासून आपण दूर रहायला हवे. कारण याद्वारे अमेरिकेत राहणाऱ्या कुशल तंत्रज्ञांना आणि कायद्याचे पालन करणाऱ्यांना त्रास होऊ शकतो. यामुळे अमेरिकेच्या इतर देशांशी असलेल्या स्पर्धेवरही प्रभाव पडेल, अशी भीती पत्रामध्ये व्यक्त करण्यात आली आहे. ट्रम्प बाहेरून येणाऱ्या कुशल लोकांना प्रतिबंध घालू इच्छित आहेत. परंतू येथील अर्थतज्ज्ञांच्या मतानुसार या लोकांचा अमेरिकेलाच फायदा होत आहे, असेही पत्रात लिहिण्यात आले आहे.
तसेच कुशल परदेशी कर्मचाऱ्यांबाबत सरकार जी वागणूक देण्याचा विचार करत आहे त्यावरही पत्रामध्ये पश्न उपस्थित केले गेले आहेत. या कर्मचाऱ्यांमध्ये आयटी क्षेत्रासोबतच आर्किटेक्ट, अर्थशास्त्री, शास्त्रज्ञ आणि शिक्षकांचाही समावेश आहे.