इस्लामाबाद - भारतविरोधी कारवाया करणारा कुख्यात दहशतवादी आणि 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिझ सईदवरून अमेरिकेने भारताला ठेंगा दाखवल्याची शंका उपस्थित होत आहे. अमेरिकेने पाकिस्तानला दिलेल्या 75 दहशतवाद्यांच्या यादीत बंदी घातलेल्या जमात उल दावा संघटनेचा म्होरक्या हाफिझ सईद याचे नाव नसल्याचा दावा पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांनी केला आहे. हाफिझ सईद हा यावर्षी जानेवारी महिन्यापासून नजरकैदेत आहे. तसेच दहशतवादी कारवायांप्रकरणी त्याच्यावर एक कोटी रुपयांचे बक्षीसही ठेवण्यात आले आहे. दरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानच्या संसदेत सांगितले की, अमेरिकेने पाकिस्तानला 75 दहशतवाद्यांची यादी सोपवली आहे. तर पाकिस्तानने अमेरिकेला 100 दहशतवाद्यांची यादी दिली आहे. मात्र या यादीमध्ये एकही पाकिस्तानी दहशतवादी नाही. भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांच्यामध्ये झालेल्या चर्चेत पाकिस्तानमधील दहशतवादाच्या मुद्यावर चर्चा झाली होती.तसेच दहशतवादाच्या मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांनी पाकिस्तानला खडसावले होते. तसेच पाकिस्तानने दहशतवाद्यांची आश्रयस्थाने नष्ट केल्याशिवाय डोनाल्ड ट्रम्प यांची दहशतवादाविरोधातील रणनीती प्रभावी ठरणार नाही, यावरही सहमती झाली होती. हाफिज पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक आहे. भारतातील विविध दहशतवादी हल्ल्यांमध्ये तोयबाचा हात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे भारताबरोबरच आंतरराष्ट्रीय सुमदायाने तोयबावर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव टाकला होता. या दबावानंतर समाजसेवा करत असल्याचे भासवण्यासाठी हाफिजने जमात उल दावाची स्थापना केली. मात्र, हाफिजची ही चतुराई फार काळ टिकली नाही. अमेरिकेने 2014 मध्येच जमात उल दावालाही दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होते.
हाफिझ सईदवरून अमेरिकेचा भारताला ठेंगा? अमेरिकेने दिलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत हाफिझ सईदचे नाव नसल्याचा पाकचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 12:04 AM