ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 1 - सात मुस्लिम बहुल देशांतील नागरिकांना अमेरिका प्रवेश बंदी घालण्यात आल्यानंतर या यादीत आगामी काळात पाकिस्तानाचाही समावेश होणार असल्याचे अमेरिकेकडून देण्यात आले आहेत. यामुळे पाकिस्तानची घाबरगुंडी उडाल्याचे पाहायला मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर 'जमात-उद-दावाचा प्रमुख आणि कुख्यात दहशतवादी हाफिज सईदला राष्ट्रहितासाठी नजरकैद ठेवण्यात आले असून भारतासोबत आम्हाला युद्ध करायचे नाही', अशी भूमिका पाकिस्तानी सैन्याने मांडली आहे. 'राष्ट्रहितासाठी घेण्यात आलेल्या धोरणात्मक निर्णयांतर्गत हाफिज सईदवर नजरकैदेची कारवाई करण्यात आली आहे', असे पाकिस्तानी सैन्याने मंगळवारी सांगितले. शिवाय, आम्हाला भारतासोबत युद्ध करायचे नाही, असा दावा करतेवेळी या निर्णयाला पाकिस्तानची कमजोरी समजू नका, अशा फुशारक्याही पाकिस्ताननं मारल्या आहेत.
पाकिस्तानातील इंटर-सर्विसेज पब्लिक रिलेशन्स (ISPR)चे डीजी मेजर जनरल आसिफ गफूर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना हे विधान केले आहे. पाकिस्तानातील वृत्तपत्र 'डॉन'ने दिलेल्या माहितीनुसार, आसिफ गफूर यांनी हाफिज सईदला नजरकैदेत ठेवण्यामागे कोणत्याही अन्य देशांचा दबाव असल्याच्या बातम्यांना फेटाळून लावले. जमात-उद-दावाचा प्रमुख आणि मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला सोमवारी पाकिस्तानात नजरकैदेत ठेवण्यात आले. पाकिस्तान सरकारकडून जमात-उद-दावावरही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, आसिफ गफूर यांनी भारत-पाकिस्तानमधील वाढलेल्या तणावासंदर्भात भाष्य करताना सांगितले की, 'आम्हाला कुणाही सोबत युद्ध नकोय. युद्ध हे कोणत्याही समस्येवरील समाधान नाही', असा सभ्यपणाचा आव आणला. मात्र याचवेळी काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत 'संयुक्त राष्ट्रांच्या चर्चेच्या माध्यमातून आम्हाला काश्मीर समस्येवर तोडगा हवाय, मात्र शांततेसाठीच्या आमच्या इच्छेला कमजोरी समजण्याची चूक करू नका', अशी दुटप्पी भूमिकाही पाकिस्तानने यावेळी मांडली.
डॉनने दिलेल्या बातमीनुसार, आसिफ गफूर यांनी भारताने पाकिस्तानविरोधात केलेल्या सर्जिकल स्ट्राईक कारवाईला 'ड्रामा'चा एक 'भाग' असल्याचा थयथयाट केला. शिवाय, काश्मीरच्या मुद्यावरुन जगाचे लक्ष भरकटवण्यासाठी भारत असे वागत असल्याचा कांगावाही त्यांनी केला.