लाहोर : मुंबई हल्ल्याचा सूत्रधार व बंदी घातलेल्या जमात-उद-दावा या संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याला बुधवारी पाकिस्तानात अटक झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. मात्र, सईद हा तुरुंगात नसून एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या बंगल्यात राहत असल्याचे समोर येत आहे.
हाफिज सईदला अटक करण्यात आल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वताची पाठ थोपटून घेतली होती. तसेच दहा वर्षांच्या शोधानंतर हाफिज सापडल्याचे म्हटले होते. यावेळी पाकिस्तानच्या एक अँकरने त्यांना हाफिजला शोधले नाही, तर तो पाकिस्तानात खुलेआम फिरत असल्य़ाचे सांगितले होते. हाफिजला अटक करून पाकिस्तानने अमेरिकेची वाहवा मिळविलेली असली तरीही कारवाईच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानचा फोलपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान 21 जुलैला अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. आधीच आर्थिक संकटाने पिचलेल्या देशाला अमेरिकेने थांबविलेली लाखो कोटींची मदत पुन्हा सुरू करावी, असे त्यांचे यावेळी प्रयत्न आहेत. अमेरिकने पाकिस्तान दहशतवादाला पोसत असल्याचा आरोप ठेवत आर्थिक मदत थांबविली होती. य़ामुळे पाकिस्तानने खान यांच्या दौऱ्याच्या आठवडाभर आधी हाफिज सईदला अटक करण्याचे नाटक रचले आहे. हाफिज सईद याला बुधवारी पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी विभागाने (सीटीडी) तेथील पंजाब प्रांतातून अटक केली. दहशतवादविरोधी न्यायालयासमोर एका खटल्यासाठी हजर होण्याकरिता गुजरनवाला येथून लाहोरला चाललेला असताना त्याला अटक करण्यात आली.