ऑनलाइन लोकमत
लाहोर, दि. 16 - मुंबई 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड आणि जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदने पाकिस्तान सरकारला आपल्यावर देशाबाहेर प्रवास न करण्यासाठी घालण्यात आलेली बंदी उठवत, यादीतून आपलं नाव काढून टाकण्याचा आदेशच देऊन टाकला आहे. आपल्यामुळे सुरक्षेला कोणताही धोका नसून, आपली संस्था कोणत्याही दहशतवादी घडामोडींमध्ये सहभागी नसल्याचा दावा करत हाफिज सईदने ही मागणी केली आहे.
पाकिस्तानचे अंतर्गत मंत्री चौधरी निसार अली खान यांना हाफिज सईदने यासंबंधी पत्र पाठवलं आहे. पाकिस्तान सरकारने गेल्या महिन्यात हाफिज सईदसह 37 जणांवर प्रवासबंदी लावली असून या सर्वाना देशाबाहेर प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. यामध्ये हाफिज सईदच्या फलाह-ए-इन्सानियत संस्थेचाही समावेश आहे. यासोबतच सईदसह इतर चार जणांना शांतता आणि सुरक्षेला धोका पोहोचवणा-या कारवायांमध्ये सहभागी झाल्याबद्दल 90 दिवसांच्या घरकैदेत ठेवण्यात आलं आहे.
हाफिज सईदने मात्र सरकारच्या या निर्णयाचा विरोध करत आपली संस्था कोणत्याच दहशतवादी कारवायांमध्ये कधी सहभागी झाली नसल्याचा दावा केला आहे. 'माझ्या संस्थेविरोधात दहशतवाद किंवा संपत्तीचं नुकसान केल्याचं कोणतंच प्रकरण अद्याप समोर आलेलं नाही', असं हाफिजचं म्हणणं आहे. 'आपल्याविरोधात एकही पुरावा कोणी सादर करु शकलेलं नाही असा दावा करत आपल्यावर लावण्यात आलेली बंदी उठवा', अशी मागणी हाफिजने केली आहे.