ऑनलाइन लोकमतइस्लामाबाद, दि. 14 - जमात उद दावाचा म्होरक्या आणि मुंबईतल्या 26/11च्या हल्ल्यातील मुख्य सूत्रधार हाफिज सईद हा जिहादच्या नावाखाली दहशतवाद पसरवत असल्याची पाकिस्ताननं अखेर कबुली दिली आहे. अमेरिकेच्या दबावानंतर पाकिस्ताननं हाफिज सईद आणि त्याच्या पिल्लावळीला नजरकैदेत ठेवले आहे. या प्रकरणी झालेल्या एका सुनावणीत पाकिस्ताननं न्यायालयासमोर अशी भूमिका मांडली आहे. काश्मिरींच्या हक्कांवर बोलण्यापासून परावृत्त करण्यासाठी आपल्याला पाकिस्तानने नजरकैदेत ठेवल्याची तक्रार हाफिज सईदने न्यायालयात केली होती. मात्र मंत्रालयानं हाफीज सईदनं केलेले हे आरोप फेटाळले आहेत. तसेच सईद आणि त्याचे सहकारी जिहादच्या नावाखाली दहशतवाद पसरवत असल्यानंच त्यांना नजरकैदेत ठेवल्याचेही पाकिस्ताननं न्यायालयाला सांगितले आहे.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एजाज अफजल खान, लाहोर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आयेशा ए मलिक आणि बलूचिस्तान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जमाल खान यांच्या तीन सदस्यीय खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 15 मे रोजी होणार असून, सईद आणि त्याचे चार सहकारी जफर इकबार, अब्दूल रहमान आबिद, अब्दुल्लाह उबेद व काझी कशीफ नियाज यांना ताब्यात घेण्यासंबंधी सर्व पुरावे देण्यास न्यायालयानं पाकिस्तान सरकारला सांगितलं आहे. काल झालेल्या सुनावणीत सईदने आपली बाजू स्वत:च मांडणार असल्याचे न्यायालयात स्पष्ट केलं होतं. सईद म्हणाला, माझ्यावर पाकिस्तान सरकारने लावलेले आरोप कोणालाही सिद्ध करता आले नाहीत. मला आणि माझ्या सहकाऱ्यांना काश्मिरींच्या हक्कावर आणि सरकारच्या नीतीवर बोलण्यापासून परावृत्त केले जात आहे. यावेळी पाकिस्तानने आपण संयुक्त राष्ट्र संघ आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या दबावाखाली या नेत्यांना नजरकैदेत ठेवल्याचंही न्यायालयाला सांगितले आहे. गेल्या 30 एप्रिल रोजी पंजाब सरकारने हाफिज सईद आणि त्याच्या चार सहकाऱ्यांच्या नजरकैदेत 90 दिवसांनी वाढ केली होती. पाकिस्तानने सईद आणि त्याच्या साथीदारांवर अमेरिकेने दिलेल्या इशाऱ्यांनंतर कारवाई करण्यात आली होती. पाकिस्तानने जर जमात उद दावासह सईदविरोधात कारवाई न केल्यास त्यांच्यावरही बंदी आणू, असा इशाराच अमेरिकेनं दिला होता.
हाफिज सईदच पसरवतोय दहशतवाद, पाकची कबुली
By admin | Published: May 14, 2017 5:56 PM