ऑनलाइन लोकमत -
मुझफ्फराबाद, दि. 11 - हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वनीला मारला गेल्यानंतर एकीकडे काश्मीरमध्ये हिंसाचार सुरु असताना पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये बुरहान वनी समर्थनार्थ श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुझफ्फराबादमधील हिजबुल बेसवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या श्रद्धांजली कार्यक्रमात हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाऊद्दीन आणि मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड जमात-उल-दावाचा प्रमुख हाफिज सईद सहभागी झाले होते. या कार्यक्रमात बुरहान वनीच्या समर्थनार्थ पोस्टरही लावण्यात आले होते.
हाफिज सईद जमात-उल-दावाच्या सायबर सेल सदस्यांसोबत या बैठकीत पोहोचला होता. सय्यद सलाऊद्दीनदेखील आपल्या सरर्थकांसह या बैठकीत हजर होता. पाकिस्तानने या संधीचा फायदा घेतला पाहिजे असं यावेळी हाफिज सईद बोलला आहे. हाफिज सईदने बैठकीत उपस्थितांना संबोधित करताना काश्मीर खो-यात भारताविरोधी भावना भडकवण्याचं आवाहन केलं आहे अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
पाकिस्तानमध्ये उघडपणे दहशतवाही कारवाया होत आहेत हे यावरुन सिद्ध होतं. पाकिस्तान आपल्या जमिनीचा उपयोग भारताविरोधात पाऊलं उचलण्यासाठी करत असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग बोलले आहेत.
कुख्यात दहशतवादी बुरहान वानीच्या खात्म्यानंतर काश्मीरमध्ये सुरु झालेला हिंसाचार कायम आहे. या हिंसाचारात चार दिवसात आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोनशेहून अधिक जण जखमी आहेत. जखमींमध्ये सुमारे शंभर जवनांचा समावेश आहे. काश्मीरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्त्वात उच्चस्तरीय बैठक सुरु आहे. या बैठकीसाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल यांच्यासह महत्त्वाचे अधिकारी उपस्थित आहेत.
दुसरीकडे काश्मीर मुद्द्यावरुन राजनाथ सिंह यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी चर्चा केली. काश्मीर खोऱ्यात संचारबंदीसदृश स्थिती आहे. तर मोबाइल आणि इंटरनेट सेवा ठप्प आहे.
हिजबुल मुजाहिदीनच्या वरिष्ठ कमांडरला ठार मारून भारताने काश्मीरमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप रविवारी पाकिस्तानने केला. काश्मीर प्रश्न केवळ तेथील नागरिकांना स्वयंनिर्णयाचा हक्क असल्याचे मान्य केले तरच सोडवला जाणे शक्य आहे, असेही पाकने म्हटले. निष्पाप काश्मिरी नागरिकांच्या सततच्या हत्यांचा पाक कठोरपणे निषेध करतो. बुरहान वनी व असंख्य निष्पाप काश्मिरींची हत्या ही खेदजनक व निषेधार्थ असून, त्यामुळे काश्मिरींच्या मूलभूत मानवी हक्कांचे उल्लंघन होते. हत्यांमुळे जम्मू आणि काश्मिरींच्या स्वयंनिर्णयाला रोखता येणार नाही, असे त्यात म्हटले.
गृहमंत्र्यांची मेहबूबांशी चर्चा
गृहमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. सरकारकडून आवश्यक ती मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले, काश्मीरमधील स्थितीबाबत अर्धा तास चर्चा झाली. मेहबूबा यांनी राजनाथसिंह यांना माहिती दिली. त्यानंतर राजनाथसिंह यांनी गृहखात्याच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.
अमरनाथ यात्रा स्थगित
काश्मीरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रा सलग दुसऱ्या दिवशी स्थगित करण्यात आली आहे. जम्मूचे उपायुक्त सिमरनदीप सिंह यांनी सांगितले की, ही यात्रा रविवारीही बंद होती. जम्मूूहून आज नवा जथा पाठविण्यात आला नाही. तथापि, काश्मीरहून आधार शिबिरातून यात्रा सुरू आहे.