ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. २६ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अचानक लाहोर येथे उतरून पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क लढवले जात असून कौतुकही केले जात आहे. पण मोदी-शरीफ यांच्या या भेटीमुळे मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड, कुख्यात दहशतवादी हाफीज सईदचा मात्र तिळपापड झाला असून त्याने आगपाखड केली आहे. ' पाकिस्तानच्या शत्रूचे असं स्वागत का?' असा सवाल करत मोदींच्या या अचानक पाक भेटीमुळे पाकिस्तानची जनता दुखावली गेली आहे, अशा शब्दांत सईदने संताप व्यक्त केला.
सईदने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावरही टीकास्त्र सोडले आहे. मोदी नेहमी पाकिस्तानविरोधात बोलतात, कारवाया करतात. अशा मोदींना भेटून शरीफ यांनी पाकिस्तानी जनतेचा अपमान केला आहे. याबद्दल शरीफ यांनी जनतेला स्पष्टीकरण द्यायला हवे, अशी मागणीही त्याने केली. तसेच काश्मिरी जनतेबद्दल सहानुभूती व्यक्त करत काश्मिर हा पाकिस्तानचाच भाग असल्याचा पुनरुच्चार त्याने केला.