इस्लामाबाद- हाफिज सईदचा मिल्ली मुस्लीम लीग हा पक्ष पाकिस्तानात होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये उतरणार आहे. पाकिस्तानच्यापोल पॅनलने मिल्ली मुस्लीम लिगचा अर्ज दुसऱ्यांदा नाकारल्यावर हाफिजच्या उमेदवारांनी एएटी नावाने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. या पक्षाची नोंदणी पाकिस्तानच्या निर्वाचन आयोगात यापुर्वीच झालेली आहे. बुधवारी एमएमएलच्या नोंदणीचा अर्ज नाकारला गेल्यानंतर हाफिजच्या उमेदवारांनी हा निर्णय घेतला आहे. हाफिज सईद हा जमात उद दवाचा दहशतवादी असून मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आहे.
एमएमएलचे अध्यक्ष सैफुल्ला खालिद हे हाफिजचे जावई आहेत असं गृहमंत्रालयाने निर्वाचन आयोगाला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे त्यामुळेच आयोगाने आमचा अर्ज मान्य केला नाही, खरंतर सैफुल्ला व हाफिज हे एकमेकांचे दूरचे नातेवाईकसुद्धा नाहीत असा दावा एमएमएलच्या लोकांनी केला आहे. हे पत्र गुप्त राखले जावे अशी विनंती गृह मंत्रालयाने निर्वाचन आयोगाला केली होती मात्र खंडपिठातील एका सदस्याने आमच्या वकिलाला ही माहिती दिली अशी माहितीही एमएमएलने दिली आहे. निर्वाचन आयोगाच्या निर्णयाला वरिष्ठ न्यायालयांमध्ये आव्हान दिले जाईल असे एमएमएलचे प्रवक्ते तबिश कयुम यांनी सांगितले. पक्षाच्य़ा नोंदणीचा खटला अनेक महिने इस्लामाबाद उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचेही त्यांनी सांगितले. एमएमएलची स्थापना गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात झाली. लष्कर ए तय्यबाशी आपला काहीही संबंध नसल्याचे या पक्षाने जाहीर केले होते.