ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 21 - पाकिस्तान सरकारला अखेर जाग आली असून मुंबई 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद देशासाठी धोका असल्याची जाणीव त्यांना झाली आहे. 'हाफिज सईद देशासाठी गंभीर धोका असून देशहितासाठीच त्याला अटक करण्यात आली आहे', असं वक्तव्य पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलं आहे.
२६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असल्याचे सज्जड पुरावे देऊनही इतकी वर्षे पाठीशी घातल्यानंतर जमात-उद-दवा (जेयूडी)चा प्रमुख हाफिज सईद याला अखेर पाकिस्तानातही दहशतवादी ठरविण्यात आले आहे. अतिरेकी हल्ल्यांमध्ये स्वत:च्या शेकडो नागरिकांचे बळी जात असलेल्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पडल्याची जाणीव झाल्यानंतर ही उपरती झाली आहे.
पंजाब प्रांताच्या सरकारने हाफिज सईद आणि काझी काशिफ या त्याच्या निकटच्या सहकाऱ्याचे नाव दहशतवादविरोधी कायद्याच्या चौथ्या परिशिष्टात समाविष्ट केले आहे. फैसलाबाद येथील अब्दुल्ला ओबैद आणि ‘मर्काज-ई-तैयबाचे झफर इक्बाल व अब्दुल रहमान आबिद यांनाही पंजाबच्या प्रांतीक सरकारने या कायद्याच्या कक्षेत आणले आहे. दहशतवादविरोधी विभागाने सईदसह या पाच जणांवर कायद्यानुसार कारवाई करावी, असे निर्देशही पंजाब सरकारच्या गृह विभागाने दिले आहेत. या पाचही जणांना ३० जानेवारीपासून नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. शिवाय हाफिज सईदसह ‘जेयूडी’ आणि ‘फलाह-ई-इन्सानियत’शी संबंधित ३७ जणांना देश सोडून जाण्यास प्रतिबंधही करण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानने भारताच्या मागणीप्रमाण हाफिज सईदविरोधात कारवाईची पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. हाफीजविरुद्धच्या कारवाई म्हणजे मुलकी सरकारच्या पाठीशी पाकचे लष्कर ठामपणे उभे आहे व पाकिस्तानचे सुरक्षाविषयक अग्रक्रम बदलत आहेत, याचे द्योतक मानले जात आहे. २६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतरही सईदला काही काळ नजरकैदेत ठेवण्यात आले होते. परंतु वर्षभरातच न्यायालयाने त्याला मुक्त केले. सईदचे दहशवादाशी असलेले संबंध मान्य करून अमेरिकेने त्याच्यावर १० दशलक्ष डॉलरचे बक्षिस जाहीर केले आहे.
हाफिज सईदने पाकिस्तान सरकारला आपल्यावर देशाबाहेर प्रवास न करण्यासाठी घालण्यात आलेली बंदी उठवत, यादीतून आपलं नाव काढून टाकण्याचा आदेशच देऊन टाकला आहे. आपल्यामुळे सुरक्षेला कोणताही धोका नसून, आपली संस्था कोणत्याही दहशतवादी घडामोडींमध्ये सहभागी नसल्याचा दावा करत हाफिज सईदने ही मागणी केली.
पाकिस्तानचे अंतर्गत मंत्री चौधरी निसार अली खान यांना हाफिज सईदने यासंबंधी पत्र पाठवलं आहे. पाकिस्तान सरकारने गेल्या महिन्यात हाफिज सईदसह 37 जणांवर प्रवासबंदी लावली असून या सर्वाना देशाबाहेर प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. यामध्ये हाफिज सईदच्या फलाह-ए-इन्सानियत संस्थेचाही समावेश आहे. यासोबतच सईदसह इतर चार जणांना शांतता आणि सुरक्षेला धोका पोहोचवणा-या कारवायांमध्ये सहभागी झाल्याबद्दल 90 दिवसांच्या घरकैदेत ठेवण्यात आलं आहे.
हाफिज सईदने मात्र सरकारच्या या निर्णयाचा विरोध करत आपली संस्था कोणत्याच दहशतवादी कारवायांमध्ये कधी सहभागी झाली नसल्याचा दावा केला आहे. 'माझ्या संस्थेविरोधात दहशतवाद किंवा संपत्तीचं नुकसान केल्याचं कोणतंच प्रकरण अद्याप समोर आलेलं नाही', असं हाफिजचं म्हणणं आहे. 'आपल्याविरोधात एकही पुरावा कोणी सादर करु शकलेलं नाही असा दावा करत आपल्यावर लावण्यात आलेली बंदी उठवा', अशी मागणी हाफिजने केली आहे.