जगातील कोणत्या देशात हेअरकट करण्यासाठी सर्वाधिक पैसे मोजावे लागतात? हे आपल्याला माहीत आहे का? तर याचे उत्तर आहे नॉर्वे. NetCredit नुसार, या युरोपीय देशाची राजधानी असलेल्या ओस्लो येथे केशकर्तनासाठी आपल्याला 64.50 डॉलर्स अर्थात सुमारे 5,530 रुपये मोजावे लागतात. या यादीत भारत फार मागे आहे. आपण नवी दिल्लीतील कोणत्याही चांगल्या सलूनमध्ये $5.29 अर्थात सुमारे 454 रुपयांमध्ये केशकर्तन करू शकता. जर झाडाखाली बसून हेअरकट करायची असेल तर ५० रुपयांतही हे काम होऊ शकते. मात्र आम्ही, येथे चांगल्या सलूनसंदर्भात बोलत आहोत.
जपानचा दुसरा क्रमांक -हेअरकट सदर्भात सर्वात महागड्या देशांच्या यादीत जपानचा दुसरा क्रमांक लागतो. या देशात केशकर्तनासाठी 56 डॉलर एवढा खर्च येतो. डेन्मार्क, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, यूएस आणि स्वित्झर्लंडमध्ये, हेअरकटसाठी 40 हून अधिक मोजावे लागतात. याच प्रमाणे, फ्रान्स, दक्षिण कोरिया, इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रिया आणि फिनलंडमध्ये केस कापण्यासाठी 30 डॉलर पेक्षा अधिक खर्च येतो. आयर्लंड, झेक प्रजासत्ताक, कॅनडा, पोलंड, पोर्तुगाल, इटली, स्पेन आणि सौदी अरेबियामध्ये केस कापण्यासाठी 20 डॉलरहून अधिक द्यावे लागतात.
भारतापेक्षाही स्वस्त आहेत हे 4 देश -दक्षिण आफ्रिका, रशिया, चिली, ग्रीस, बेलारूस, हंगेरी, कझाकस्तान, युक्रेन, कोलंबिया, मेक्सिको, व्हिएतनाम, ब्राझील आणि अल्जेरियामध्ये केस कापण्यासाठी 5 डॉलरपेक्षा अधिक मोजावे लागतात. याशिवाय, पाकिस्तान, अर्जेंटिना, नायजेरिया आणि झांबियामध्ये केशकर्तनासाठी भारतापेक्षाही कमी पैसे लागतात. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील एका चांगल्या सलूनमध्ये केशकर्तनासाठी 4.44 डॉलर एवढा खर्च लागतो. अर्जेंटिनामध्ये 3.15 डॉलर लागतात, नायजेरियामध्ये 1.83 डॉलर लागतात. तर झांबियामध्ये 1.65 डॉलर मोजावे लागतात.