लोकमत न्यूज नेटवर्क : पृथ्वीवरील अनेक भागात सध्या उष्णतेचा कहर सुरू आहे. युरोप, अमेरिका आणि चीनमध्ये या संकटाने भीषण रूप धारण केले आहे. फ्रान्स, स्पेन, पोर्तुगालसह १० देशांमधील जंगले उष्णतेमुळे पेटत आहेत. हवामान तज्ज्ञांनी इशारा दिला आहे, यंदा उष्णतेचे सर्व विक्रम मोडित निघतील. आरोग्य तज्ज्ञांनी भीती वर्तविली की, उष्णतेमुळे लोक गंभीर आजारी पडतील व मृत्यूही होऊ शकतो.
स्पेन
- ५६ ठिकाणी जंगलांमध्येआग धडाडत आहे. २२ हजार हेक्टर जंगल खाक झाले आहे. दक्षिण-पश्चिम स्पेनमध्ये पारा ४४ अंशाहून अधिक तर उर्वरित देशात ४० अंश आहे.
पोर्तुगाल
- उत्तरेत जंगलात लागलेल्या आगीत २ बळी गेले आहेत. १२ हजार एकर जमीन प्रभावित झाली आहे.जुलैमध्ये एकाच महिन्यात पारा सर्वोच्च ४७ अंशांवर पोहोचला आहे.
फ्रान्स
- एका आठवड्यात दक्षिण-पश्चिम भागातील जंगलांमध्ये आगी लागल्या आहेत. १४ हजारहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. पारा ३३ अंशांहून अधिक आहे.
इंग्लंडमध्ये आणीबाणी
उष्णतेच्या लाटेमुळे संपूर्ण इंग्लंड त्रासून गेले आहे. तेथील तापमाना सहारा वाळवंटापेक्षाही अधिक आहे. हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे की देशाचे तापमान पहिल्यांदा ४० अंशाच्या पार जाऊ शकते. सतर्क राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे. याआधी २०१९ मध्ये इथे सर्वाधिक नोंदले गेलेले तापमान ३८.७ अंश सेल्सियस इतके होते. आता पारा दोन अंशांनी वाढला आहे. नॉटिंघमशायर, हैम्पशायर आणि ऑक्सफोर्डशायर या शहरांमध्ये उष्णतेमुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या. आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अमेरिका
- जवळपास ५.५८ कोटी म्हणजेच १७ टक्के नागरिकांना उष्णतेच्या झळा बसत आहेत. अतिभीषण स्तरापर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. स्थिती गंभीर झाल्यास देशात आणीबाणी लागू करण्याचा विचार सुरु आहे.
...तर अर्ध्या जगाला करावी लागेल सामूहिक आत्महत्या
जंगलांमध्ये लागलेली आग आणि उष्णतेची लाट यामुळे जगातील निम्म्याहून अधिक मानव जातीची सामूहिक आत्महत्या होईल की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. कोणत्याही देशाकडे याचे उत्तर नाही. तरीही आपली ऊर्जानिर्मितीसाठी जीवाष्ण इंधन जाळण्याची सवय काही जात नाही. - अँटोनियो गुटेरेस, संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव