वॉशिंग्टन : अल् कायदाने अमेरिकेवर केलेल्या ९/११च्या हल्ल्यांपेक्षा हमासने इस्रायलवर केलेला हल्ला अधिक भीषण आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, हमासविरुद्धच्या संघर्षात अमेरिका इस्रायलच्या बाजूने ठाम उभी आहे.पॅलेस्टाइनमधील हमास या दहशतवादी संघटनेने गेल्या शनिवारी इस्रायलवर हल्ले चढविले. त्याला इस्रायलनेही प्रत्युत्तर दिले. या संघर्षात आतापर्यंत २ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. त्यात २७ अमेरिकी नागरिकांचाही समावेश आहे. त्या पार्श्वभूमीवर बायडेन म्हणाले की, अल् कायद्याने जेवढे क्रौर्य दाखविले होते त्यापेक्षाही भयंकर पातळी हमासने गाठली आहे. हमासने केलेल्या सैतानी कृत्यांना पायबंद बसायलाच हवा. त्यामुळे इस्रायलला स्वत:च्या संरक्षणासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी अमेरिका पुरविणार आहे. इस्रायलला पाठिंबा देऊन अमेरिकेने कोणतीही चूक केलेली नाही. पॅलेस्टाइनमधील बहुतांश लोकांना हमास या दहशतवादी संघटनेशी काहीही देणेघेणे नाही हे सर्वांना माहिती आहे. मात्र हमासला तिने केलेल्या गैरकृत्यांची शिक्षा मिळणे आवश्यक आहे, असेही बायडेन यांनी नमूद केले.
‘दुसऱ्या महायुद्धानंतर ज्यूंवरील भीषण अत्याचार’
- हमासने इस्रायलमध्ये नुकतेच केलेले क्रूर हल्ले हे दुसऱ्या महायुद्धात युरोपमध्ये झालेल्या शिरकाणानंतर ज्यूंवर झालेले सर्वात प्राणघातक हल्ले आहेत असे उद्गार अमेरिकन काँग्रेसचे सदस्य जेमी रस्किन यांनी काढले.
- हमासला पूर्णपणे नेस्तनाबूद करण्यासाठी अत्यंत कठोर कारवाई करायला हवी. त्यासाठी अमेरिकेतील भारतीय वंशाच्या व्यक्तींसह सर्वांचेच सहकार्य लागणार आहे, असे ते म्हणाले.
ट्रम्प यांनीही दिला पाठिंबाअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, हमासविरुद्धच्या संघर्षात माझा इस्रायल व त्या देशाचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना पाठिंबा आहे. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी इस्रायलविरोधी वक्तव्य केले होते. हमासचा हल्ला हे इस्रायली गुप्तचर यंत्रणेचे अपयश असल्याचे ते म्हणाले होते.
‘भीषण परिणाम होतील’ इस्रायलने गाझा भागावर सुरू ठेवलेले हल्ले त्वरित थांबवावेत, नाहीतर इस्रायलला त्याचे भीषण परिणाम भोगावे लागतील, असा इशारा इराणचे परराष्ट्रमंत्री हुसैन अमीर अब्दुल्लाहियन यांनी दिला आहे.
एअर इंडियाची विमानसेवा बुधवारपर्यंत स्थगितएअर इंडियाने इस्रायलची राजधानी तेल अवीव येथे जाणाऱ्या आपल्या विमानसेवेच्या स्थगितीची मुदत येत्या बुधवारपर्यंत वाढविली आहे. दर आठवड्याला एअर इंडियाच्या विमानाच्या भारतातून तेल अवीवला पाच फेऱ्या होत असत.