कोणाच्याही काहीही ध्यानीमनी नसताना शक्तिशाली इस्त्रायलच्या बालेकिल्ल्यांवर हमासनं अचानक हल्ले केले आणि अनेकांना ठार केलं, विध्वंस केला, पण त्याची साधी खबरही इस्त्रायलला आधी लागली नाही, याचं सगळ्या जगाला आश्चर्य वाटतं आहे. इस्त्रायलच्या तुलनेत हमास ही दहशतवादी संघटना म्हटलं तर अतिशय किरकोळ, पण तरीही तिनं इस्त्रायलला जोरदार टक्कर दिली. अजूनही हा संघर्ष मिटलेला नाही आणि जीवित, वित्तहानी सुरूच आहे. पण, हमासमध्ये एवढी ताकद' आणि हिंमत आली कुठून? इतकी शस्त्रं या संघटनेला मिळाली कशी, तिनं ती ठेवली कुठे आणि ऐनवेळी ती बाहेर काढली कशी, हे गूढ प्रत्येकालाच सतावतं आहे. यामागे हमासचे गेल्या कित्येक वर्षांपासूनचे शिस्तबद्ध प्रयत्न आणि तयारी हा भाग तर आहेच, पण इस्त्रायलच्या डोळ्यांत ते धूळ फेकू शकले याचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे गाझापट्टीत जमिनीखाली असलेली शेकडो भुयारं या भुयारांमुळे हमासची ताकद वाढली, तिथेच तिनं आपली संहारक शस्त्रं ठेवली आणि तिथूनच इस्त्रायलवर हल्ला केला.
इस्त्रायलच्या ज्या अनेक नागरिकांना हमासनं ओलीस ठेवलं होतं, त्यांनाही त्यांनी तिथेच ठेवलं होतं. इस्त्रायलवर ७ ऑक्टोबरला त्यांनी जो अचानक हल्ला चढवला होता, तो 'यशस्वी झाला होता आणि सगळीकडे हलकल्लोळ माजवला होता, तोही या भुयारांच्याच बळावर! हमास गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या कारवायांसाठी या भुयारांचा बेमालूम वापर करीत आहे. सुरुवातीला या भुयारांचा उपयोग जीवनावश्यक गोष्टींचा साठा करण्यासाठी केला गेला, त्यानंतर हळूहळू येथे शस्त्रास्त्रे लपवण्यात आली, त्यांचा साठा करण्यात आला, तस्करीसाठीही या भुयारांचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला गेला आणि त्यानंतरचं त्यांचं लक्ष्य होतं, ते म्हणजे या भुयारांच्या मदतीनंच ठिकठिकाणी हल्ले करणं. त्यातही यशस्वी झाले. खरं तर त्याहीआधी या भुयारांचा उपयोग केला गेला तो आपल्या आप्तस्वकियांना गुप्तपणे भेटण्यासाठी. ही भुयारंही त्याचसाठी खोदण्यात आली होती. या भुयारांचे नानाविध उपयोग लक्षात आल्यानंतर मग मोठ्या प्रमाणात आणखी भुयारं इथे खोदण्यात आली. प्रियजनांना भेटण्यासाठी बांधलेले हे बोगदे आता हमासचे सर्वांत शक्तिशाली शस्त्र आहे.
गाझामधील बोगद्यांची मूलभूत वैशिष्ट्ये आहेत जी इस्रायल आणि जगातील इतर ठिकाणच्या गुहा आणि खाणींशी जुळतात. परंतु, येथील प्रत्येक बोगदा वेगळा आहे. येथील भौगोलिक, भूवैज्ञानिक आणि भूराजकीय परिस्थितीशीही या भुयारांचा निकटचा संबंध आहे. या भुयारांचा इतिहासही तसा फार जुना आहे. १९८२ ची गोष्ट. गाझा आणि इजिप्तमधील राफा सीमा पूर्णपणे खुली करण्यात आली, पण सीमेवरील बांधकामामुळे राफा शहरात राहणारे अनेक लोक त्यांच्या कुटुंबापासून विभक्त झाले. या लोकांनी त्यांना पुन्हा भेटण्यासाठी येथे बोगदे केले. तेथून आवश्यक वस्तूंची वाहतूकही सुरू झाली. त्यावेळी या बोगद्यांचा, भुयारांचा वापर हिंसेसाठी केला जात नव्हता. १९९४ मध्ये मात्र येथून शस्त्रास्त्रांची तस्करी सुरू झाली. सन २०००नंतर इथल्या भुयारांची संख्या वेगानं वाढू लागली. कारण या बोगद्यांचे 'अष्टपैलू' गुणधर्म आता सगळ्यांच्याच लक्षात आले होते. भुयारात लपलेले हमासचे अतिरेकी, तिथूनच चाललेल्या त्यांच्या कारवाया आणि भूमिगत असल्यामुळे रडारच्याही ते नीट दृष्टिक्षेपात येत नसल्यानं इस्त्रायललाही हमासवर
जमिनीखाली बहुमजली भुयारं !
इस्त्रायलच्या सीमेवर हल्ले करण्यासाठी हमासनं इथे बरीच भुयारं खोदली. ही भुयारं म्हणजे जणू काही छोटी शहरंच आहेत. ती फार लांब नाहीत, पण बरीच गुंतागुंतीची आहेत.. मुंग्यांचं वारुळ जसं असतं. त्याप्रमाणे वळणावळणांची आणि भुलभुलैया निर्माण करणारी. यातली अनेक भुयारे तर बहुमजली आहेत. तिथे खोल्या आहेत. हॉल आहेत, विविध गोष्टींचा साठा करण्यासाठी कोठारं आहेत. काही भुयारं तर अनेक किलोमीटर लांबीची आहेत. मॅप किंवा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अंतराळातून ती हुडकून काढणंही अतिशय जिकिरीचं आहे! हल्ले करण्यात अडथळे येत आहेत. भुयारांचा हा उपयोग ओळखून हमासने आपल्या भूमिगत हालचाली वाढवल्या आणि तिथूनच इसायली सैन्याच्या चौक्यांवर हल्ले केले.
२००५ मध्ये जेव्हा इस्रायली सैन्याने गाझापट्टीतून माघार घेतली तेव्हा हमासला 'स्वातंत्र्य' मिळालं आणि त्यांनी या भुयारांच्या प्रकल्पांवर आणि पुननिर्माणावर जोरदार काम सुरू केलं. दुसरीकडे इजिप्त आणि गाझा दरम्यानही शेकडो भुयारं तयार केली गेली. त्यांना रोखण्याचा फारसा प्रयत्न इजिप्तकडूनही झाला नाही. हमासने या भुयारांमध्ये रॉकेट आणि इतर धोकादायक शस्त्रांचा साठा ठेवण्यास सुरुवात केली. तिथे त्यांनी चक्क आपलं मुख्यालय आणि नियंत्रण कक्षही थाटलं. तिथे त्यांनी जणू काही आपलं 'सार्वभौम' राष्ट्र थाटलं आणि तिथूनच आपला 'राज्यकारभार सुरू केला! आपली शक्ती वाढवायला सुरुवात केली!