इस्रायल - इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील तणाव वाढला आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले सुरु झाले आहेत. हमासने इस्रायलच्या (Israel) दिशेने क्षेपणास्त्रे डागली होती. या हल्ल्याला इस्रायलकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले. हमासने इस्रायलवर 130 रॉकेट डागली असून आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला असल्याचं सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात एका भारतीय महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला मूळ केरळची असल्याची माहिती आहे. इस्रायलनेही हमासला चोख प्रत्युत्तर दिलंय.
इस्रायलमध्ये राहणारी केरळची महिला फिलिस्तानी रॉकेट हल्ल्यात मृत्यूमुखी पडली आहे. अश्केलोन शहरातील 31 वर्षीय सौम्याच्या घरावर हमासने टाकलेले रॉकेट पडले. केरळमध्ये असलेल्या आपल्या पतीला व्हिडिओ कॉलद्वारे सौम्या बोलत असतानाच ही दुर्घटना घडल्याचे तिच्या दीराने पीटीआयशी बोलताना सांगितले. गेल्या 7 वर्षांपासून सौम्या या इस्रायलमध्ये घरेलू कामगार म्हणून काम करत होत्या. हमासने केलेल्या हल्ल्यात 10 लहान मुले आणि एक महिलेसह 28 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, इतर 152 नागरिक जखमी झाले आहेत.
दरम्यान, जेरूसलेमच्या अक्सा मशिदीबाहेर सोमवारी निदर्शने करण्यात आली. यावेळी इस्रायली पोलीस आणि पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला. यामध्ये शेकडो लोक जखमी झाले आहेत. त्यानंतर हमास संघटनेने इस्रायलला प्रत्युत्तर देण्याची भाषा सुरु केली. इस्रायलने जेरूसलेममध्ये राहणाऱ्या पॅलेस्टिनी नागरिकांना घरे खाली करण्यास सांगितले आहे. जेणेकरून याठिकाणी यहुदी नागरिकांना राहता येईल. यावरुन पॅलेस्टिनी नागरिक इस्रायलमध्ये सातत्याने निदर्शने करत आहेत.
नेत्यानाहू म्हणाले
इस्रायल लष्कराने ट्विटमध्ये म्हटले आहे की, हवाई हल्ल्यात तीन हमास कार्यकर्त्यांना निशाना बनविण्यात आला आणि त्यांना ठार करण्यात आले. याचबरोबर 'देश मोठ्या सामर्थ्याने प्रत्युत्तर देईल', असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले आहे. तसेच, जेरुसलेमच्या दिवशी, गाझामधील दहशतवादी संघटनांनी लाल रेषा ओलांडून जेरुसलेमच्या हद्दीत क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे, असे बेंजामिन नेतान्याहू म्हणाले.