हमासला नेस्तनाभूत करण्यासाठी इस्रायलने वर्षभरापूर्वी गाझा पट्टीवर हल्ले चढविले होते. आता जवळपास ८० टक्के गाझापट्टीतील इमारती विदीर्ण अवस्थेत आहेत. हमासचे दहशतवादी या हल्ल्यांचे लक्ष्य असताना गाझातील ७० टक्के महिला आणि मुले या युद्धात ठार झाल्याचे भीषण वास्तव समोर येत आहे.
हमासने केलेल्या हल्ल्यात १२०० हून अधिक इस्रायलींची हत्या केली होती. तर २५० लोकांचे अपहरण केले होते. यामुळे इस्रायलने गाझावर हल्ले चढविले होते. यावेळी काहीही किंमत मोजावी लागली तरी चालेल हमास संपल्याशिवाय युद्ध थांबणार नाही, असे नेतन्याहू यांनी म्हटले होते.
हमासचा आजच्या घडीला जो जो कमांडर बनला तो तो मारला गेला आहे. परंतू, हमासची शिक्षा गाझा पट्टीतील सामान्य लोकही भोगत आहेत. कित्येकांनी पलायन केले आहे. जे राहिले त्यांचे आयुष्य नरकासमान झाले आहे. संयुक्त राष्ट्र अधिकार कार्यालयानुसार गाझाच्या युद्धात झालेल्या मृत्यूंपैकी ७० टक्के या महिला आणि लहान मुले आहेत. आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याच्या मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन असल्याचे या कार्यालयाने म्हटले आहे.
युएनने त्यांच्या संस्थांकडून पुष्टी झालेल्या मृतांची संख्या ही 8,119 एवढी सांगितली आहे. तर गाझाच्या अधिकाऱ्यांनी ही संख्या 43,000 असल्याचा दावा केला होता. यामुळे नेमकी मृतांची आकडेवारी किती असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. संयुक्त राष्ट्रांचे विश्लेषण पॅलेस्टिनी दाव्याचे समर्थन करत आहे. इस्रायल-हमास युद्धात मोठ्या संख्येने महिला आणि मुले मारली गेली, असा आरोप पॅलेस्टाईनने केला आहे.