तेहरान : इराणची राजधानी तेहरान येथे बुधवारी पहाटे झालेल्या हवाई हल्ल्यात हमास या दहशतवादी संघटनेच्या राजकीय विभागाचा प्रमुख इस्माईल हानियेह हा ठार झाला. हा हल्ला इस्रायलने केल्याचा दावा करून बदला घेण्याचा इशारा इराण, हमासने दिला आहे. इस्रायल विरुद्ध हमास हा सुरू असलेला संघर्ष लवकर संपुष्टात व्हावा म्हणून प्रयत्न करणाऱ्या अमेरिका व युरोपीय देशांच्या प्रयत्नांवर हानियेहच्या हत्येमुळे पाणी पडले आहे.
गेल्या ७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर केलेल्या भीषण हल्ल्यात १२०० जण ठार झाले, तर २५० जणांना ओलिस ठेवले होते. त्यानंतर हानियेह व हमासच्या इतर नेत्यांना ठार मारण्याची प्रतिज्ञा इस्रायलने केली होती. इराणच्या नव्या राष्ट्राध्यक्षांनी त्या पदाची मंगळवारी तेहरानमध्ये शपथ घेतली. त्या समारंभाला हानियेह उपस्थित होता. इस्रायलने लेबनॉनची राजधानी बैरूत येथे हिज्बुल्लाच्या एका कमांडरवर हल्ला केला होता. त्या घटनांनंतर काही तासांनी तेहरानमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात हानियेह ठार झाला. जर पलटवार झाला तर आम्ही इस्रायलच्या पाठीशी असू, असे अमेरिकेने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
हानियेहच्या हत्येने तणाव वाढला
दमास्कसमधील इराणी दूतावासात यंदाच्या एप्रिल महिन्यात इस्रायलने हल्ला चढविला होता. त्याचवेळी इस्रायल व इराण युद्ध पेटण्याची शक्यता निर्माण झाली होती. हानियेहच्या हत्येमुळे या भागातील तणाव वाढला आहे. हानियेह तेहरानमध्ये बुधवारी हवाई हल्ल्यात ठार झाल्यानंतर इराण व इस्रायलमधील वाढलेल्या तणावाचा तेलाच्या किमतीवरही परिणाम झाला. अमेरिकेत ती किंमत ३.५६ टक्क्यांनी वाढली. तेलाची किंमत प्रत्येक बॅरलमागे ७७.३९ डॉलरवर पोहोचली आहे.
संघर्षात इराणही उतरण्याची शक्यता
इराणची राजधानी तेहरानमध्येच थेट हा हल्ला झाल्याने इस्रायलविरुद्धच्या संघर्षात इराणही उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या युद्धाची व्याप्ती आणखी वाढून त्याच्या झळा सर्व आखाती देशांना व पर्यायाने जगाला बसू शकतील अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांनी सांगितले की, तेहरानमध्ये झालेल्या हल्ल्याचा आम्ही बदला घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आमच्या पाहुण्याची इराणमध्ये हल्ला करून हत्या करण्याचे गैरकृत्य इस्रायलने केले आहे. त्याची शिक्षा त्या देशाला भोगावी लागेल. बैरूत, तेहरानमधील हल्ल्यांमुळे गाझा युद्धविरामाची आशा जवळपास मावळली असून, भविष्यात विनाशकारी प्रादेशिक युद्धामध्ये जगाला ढकलले जाण्याची शक्यता अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.
कमांडरचा मृतदेह अद्याप हिजबुल्लाहला सापडला नाही
गोलन हाइट्स भागात इस्रायलच्या ताब्यात असलेल्या प्रदेशावर २७ जुलै रोजी झालेल्या हल्ल्यात १२ अल्पवयीन व किशोरवयीन मुलांचा मृत्यू झाला होता. त्या हल्ल्यामागील सूत्रधार असलेल्या हिजबुल्लाहचा कमांडर फौद शकूर याचा खात्मा करण्याच्या हेतूने इस्रायलने मंगळवारी लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये हवाई हल्ला केला होता. त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मात्र त्याचा मृतदेह अद्याप हिजबुल्लाह या संघटनेला मिळालेला नाही. या हल्ल्यामुळे हिजबुल्लाह व इस्रायल यांच्यातील तणावही वाढला आहे.
संघर्ष वाढणार
इस्रायलच्या हल्ल्याचा बदला घेऊ, असा इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांनी इशारा दिल्याने दोन्ही देशांत आगामी काळात संघर्ष वाढू शकतो, अशी चिन्हे आहेत.