गाझा पट्टीतील रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यात 500 लोकांचा मृत्यू झाला. इस्रायलने या हॉस्पिटलमध्ये बॉम्बफेक केल्याचा आरोप पॅलेस्टाईनने केला आहे. त्याचवेळी पॅलेस्टाईनच्या इस्लामिक जिहादने डागलेल्या रॉकेटच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे. आता या हल्ल्यावर हमासची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. रक्ताचा एक थेंबही वाया जाऊ देणार नाही, असं हमासने म्हटलं आहे. हमासने सौदी अरेबियासह सर्व इस्लामिक देशांना गाझा येथील रुग्णालयावरील हल्ल्याकडे दुर्लक्ष करू नये, असं आवाहन केलं आहे.
पॅलेस्टिनी हमासचे नेते इस्माईल हनीयेह यांनी एक निवेदन जारी करून म्हटलं आहे की, 18 ऑक्टोबर रोजी सौदी अरेबियामध्ये होणाऱ्या इस्लामिक कौन्सिलच्या बैठकीत जे आमचे बांधव भेटणार आहेत त्यांनी आवाज उठवावा, त्यांची विधाने मजबूत असली पाहिजे. इस्माइल हनीयेह म्हणाले, "आम्हाला सौदी अरेबिया आणि सर्व अरब आणि इस्लामिक देशांवर विश्वास आहे. हे रक्त वाया जाणार नाही याची आम्हाला खात्री आहे."
"या शिखर परिषदेत गाझामधील हल्ल्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या नरसंहाराचा, या क्रौर्याचा, या गुन्ह्यांचा निषेध करण्यासाठी मी अरब आणि इस्लामिक देशांतील सर्व लोकांना, सर्व राजधान्यांमध्ये, सर्व शहरांमध्ये बाहेर पडण्याचे आवाहन करतो. शत्रूला रोखण्यासाठी आवाज उठवा. आपण एकत्र उभे राहिले पाहिजे. आपण इतिहास लिहित आहोत, जे आपल्या लोकांसाठी आणि राष्ट्रासाठी गौरवाचे पुढील पान असेल."
पॅलेस्टाईननेही रुग्णालयावरील हल्ल्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास म्हणाले, आमचे लोक आपल्या मातृभूमीवर ठाम राहतील आणि आम्ही सोडणार नाही, आम्ही हार मानणार नाही. राष्ट्राध्यक्ष म्हणाले, आपल्या लोकांच्या सुरक्षेसाठी अनेक आंतरराष्ट्रीय निर्णय घेतले गेले आहेत, परंतु ते अमलात आणले गेले नाहीत कारण अमेरिकेला ते लागू करायचे नाहीत. आपल्या लोकांवरील ही आक्रमकता थांबली पाहिजे आणि हे गुन्हे संपले पाहिजेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.