हमासने 7 ऑक्टोबरला इस्रायलवर दहशतवादी हल्ला केला. यानंतर, इस्रायलने हमास विरोधात थेट युद्धाचे निशाण फडकावत, गाझा पट्टीवर जबरदस्त बॉम्बिंग आणि रॉकेट हल्ले केले. या हल्ल्यांत आतापर्यंत १० हजारहून अधिक बळी गेले असून युद्ध सुरूच आहे. यातच आता, इस्रायल आणि हमास बंधकांच्या सुटकेसाठी सहमतीच्या मार्गावर आहेत.
खरे तर, इस्रायल आणि हमास बंधकांच्या बदल्यात, पॅलेस्टाईनच्या कैद्यांना सोडण्यासंदर्भात सहमतीवर पोहोचण्याच्या अगदी जवळ आहेत. वाशिंग्टन पोस्टचे कॉलमिस्ट डेव्हिड इग्नाटियस यांनी सोमवारी एका इस्रायली अधिकाऱ्याच्या हवाल्याने याची पुष्टी केली आहे.
संबंधित वृत्तानुसार, आपण इस्रायलसोबत पाच दिवसांच्या युद्धबंदीच्या बदल्यात गाझामध्ये ठेवण्यात आलेल्या 70 महिला आणि मुलांना सोडण्यास तयार आहोत, असे सोमवारी पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना असलेल्या हमासने म्हटले आहे. सशस्त्र विंगचा प्रवक्ता अबू ओबैदने इस्रायली बंधकांना सोडण्यासाठी एक अट ठेवली आहे.
या अटीत, इस्रायली बंधकांना सोडण्याच्या बदल्यात, अनेक वर्षांपासून इस्रायलच्या कारागृहात असलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांना सोडण्यात यावे, असे म्हणण्यात आले आहे. तसेच, कतारच्या मध्यस्तीने इस्रायल सोबत चर्चा सुरू असल्याचेही त्याने म्हटले आहे. मात्र, इस्रायलच्या कारागृहात किती पॅलेस्टिनी नागरीक आहेत, इस्रायलने किती लोकांना सोडवावे, हे हमासने स्पष्ट केलेले नाही.
कारागृहातील पॅलेस्टिनींची सुटका करू शकतो इस्रायल -वॉशिंग्टन पोस्टने एका इस्रायली अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, "सर्वसाधारण रूपरेषा समजली आहे. तात्पुरत्या करारात इस्रायली महिला आणि मुलांना सोडायची मागणी करण्यात आली आहे. या बदल्यात इस्रायलच्या तुरुंगात कैद असलेल्या पॅलेस्टिनी महिला आणि तरुणांचीही सुटका करण्यात येणार आहे. मात्र, इस्रायलमधून सुटका करण्यात येणाऱ्या पॅलेस्टिनी महिला आणि तरुणांची संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही.