जेरुसलेम- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता दिल्यानंतर जगभरात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. इस्रायली नेत्यांनी या निर्णयाचे जोरदार स्वागत केले असले तरी पॅलेस्टाइनने मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तुर्कस्थानने इस्रायलशी सर्व संबंध तोडण्याची भाषा केली आहे तर हमास या दहशतवाद्यांची सघंटना या सर्वांपुढे एक पाऊल जात संभाव्य धोक्याची जाणीव करुन दिली आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाने नरकाचे दार उघडले आहे अशी धोक्याची घंटा हमासने वाजवली आहे.
ट्रम्प यांनी घोषणा करण्यापुर्वी गाझामध्ये पॅलेस्टाइनच्या नागरिकांनी मोर्चे काढून अमेरिका आणि इस्रायलच्या निषेधाच्या घोषणा दिल्या होत्या आणि त्या दोन्ही देशांचे झेंडे जाळले होते. तर इस्रायलचे राष्ट्रपती रियुविन रिवलिन यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. इस्रायलच्या स्वातंत्र्याला 70 वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने यापेक्षा दुसरी कोणतीही चांगली भेट असू शकत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. जेरुसलेला मान्यता मिळणं आणि सर्व दुतावास तेथे हलवणं ही घटना ज्यू लोकांचा या भूमीवर हक्क सिद्ध करण्याच्या आणि शांततेच्या मार्गातील मैलाचा दगड मानावा लागेल.यामुळे जेरुसलेमच्या आणि संपुर्ण प्रदेशाच्या (मध्य-पूर्व) शांतता प्रक्रियेला फायदा होईल असेही रिवलिन यांनी सांगितले. रिवलिन यांच्याबरोबर इस्रायलचे अनेक मंत्री व विविध पक्षाच्या नेत्यांनी याबाबत आनंद व्यक्त केला असून अनेक वर्षांचे आपले स्वप्न पूर्ण झाल्याचे मत व्यक्त केले आहे.
(अमेरिकेचा तेल अविवमधील दुतावास)
शांतता प्रक्रियेसाठी पॅलेस्टाइनतर्फे बोलणारे प्रमुख नेते सइब इरेकाट म्हणाले, "या निर्णयामुळे शांतता प्रक्रियेमध्ये अमेरिकेची भूमिक संपुष्टात आली आहे."इस्रायलच्या संसदेतील अरब खासदार हानिन झोआबी यांनीही अमेरिकेचा निषेध केला असून आपण पॅलेस्टाइनसाठी लढणे चालूच ठेवू असे स्पष्ट केले आहे. "जेरुसलेम ही पॅलेस्टाइनची राजधानी आहे आणि त्यासाठी लढणं आम्ही चालू ठेवू. या अनावश्यक निर्णयामुळे अमेरिकेने स्वतःची मध्यस्थाची भूमिका गमावली आहे."