इस्रायलवर हल्ला केल्यानंतर हमासच्या दहशतवाद्यांनी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. रॉकेट हल्ले सुरू केल्यानंतर, त्यांनी देशाच्या अंतर्गत भागात प्रवेश केला आणि लोकांना मारलं. दहशतवाद्यांनी सुमारे 200 लोकांचे अपहरणही केलं. दहशतवाद्यांनी ज्या प्रकारे लोकांना मारलं किंवा त्यांचं अपहरण केलं त्याचे व्हिडिओही बनवले आहेत.
एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी मुलांसमोरच वडिलांना ग्रेनेडने उडवलं आहे. द सनच्या वृत्तानुसार, इस्रायलने जारी केलेल्या फुटेजच्या एका भागामध्ये, पकडलेल्या हमास दहशतवाद्याने असा दावा केला आहे की त्याला निरपराध लोकांना मारण्याचे थेट आदेश देण्यात आले होते. इस्रायलने व्हिडिओद्वारे सांगितले की, हमासच्या दहशतवाद्यांनी देशात घुसून पत्रकाराचे अपहरण कसे केले.
इस्रायलने म्हटलं आहे की, दहशतवाद्यांच्या समर्थकांकडून चुकीची माहिती पसरवण्याची मोहीम उधळून लावण्यासाठी हा व्हिडीओ जारी करण्यास भाग पाडण्यात आले. एका भागात एका वडिलांना दहशतवाद्यांनी ग्रेनेडने उडवल्याचे दिसत आहे. त्या व्यक्तीची दोन्ही मुलं रक्ताच्या थारोळ्यात पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. एक मुलगा ओरडतो, 'डॅडचा मृत्यू झाला आहे. हा विनोद नाही. मी मेलो असतो तर बरं झालं असतं.'
7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ला केल्यानंतर हमासने अशाच पद्धतीने नागरिकांची हत्या केली होती. हमासच्या हल्ल्यात 1300 हून अधिक इस्रायली लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दहशतवाद्यांनी जवळपास 200 लोकांना ओलीस बनवलं आहे. हमासच्या जायटन बटालियनच्या 24 वर्षीय दहशतवाद्याच्या चौकशीदरम्यान आणखी एक व्हिडिओ काढण्यात आल्याचा दावा इस्रायलने केला आहे. व्हिडिओमध्ये धक्कादायक दावा केला आहे. त्यात दहशतवाद्यांनी नागरिकांची हत्या कशी केली हे सांगितलं आहे.