तेल अवीव : हमासच्या दहशतवाद्यांनी आधी रॉकेट हल्ला केला, नंतर घरांमध्ये घुसून लोकांची हत्या केली आणि त्यानंतर संगीत महोत्सवात कहर केला. येथून अनेकांचे अपहरण करण्यात आले. संगीत महोत्सवात जवळपास ३५०० जण उपस्थित होते, त्यावेळी हमासच्या दहशतवाद्यांनी येथे गोळीबार केला, असे इस्रायल सरकारने म्हटले आहे. तसेच, याच ठिकाणी एक तरुणी उपस्थित होती, तिचा ऑडिओ आता सरकारने जारी केला आहे. हमासच्या हल्ल्यादरम्यान, या तरुणीने कोणालातरी फोन करून सांगितले होते की तिला गोळी लागली. या घटनेनंतर तिचा मृत्यू झाला.
सरकारने हा ऑडिओ एका पोस्टद्वारे शेअर केला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "तिच्या किंकाळ्या ऐका, रडण्याचा आवाज ऐका... हमासच्या दहशतवादाला बळी पडलेल्यांचे हेच खरे आवाज आहेत." तसेच, इस्रायली सरकारने म्हटले आहे की, ७ ऑक्टोबरला हमासने हल्ले केले आणि नागरिक, महिला आणि मुलांचे अपहरण केले. दरम्यान, येगेव डिजर्टमध्ये सुरू असलेल्या संगीत महोत्सवात हत्याकांड झाले असून याठिकाणी २६० हून अधिक मृतदेह सापडले आहेत. हल्ल्यात त्या तरुणीलाही गोळी लागली होती, या तरुणीने तिच्या एका नातेवाईकाला फोन करून हे सांगितले होते आणि हा आवाज रेकॉर्ड करण्यात आला होता.
लष्करी प्रवक्ते लेफ्टनंट रिचर्ड हेचट आणि डॅनियल हगारी यांनी रविवारी स्वतंत्र ब्रीफिंगमध्ये सांगितले की, एक राजकीय निर्णय हमासविरूद्ध कोणतीही कारवाई करण्यास सुरुवात करेल. आम्ही आमच्या राजकीय नेतृत्वाशी चर्चा करू, असे रिचर्ड हेचट यांनी एका निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, इस्रायलने गाझाभोवती हजारो सैन्य तैनात केले आहेत. तसेच, अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की सर्व आवश्यक लष्करी पुरवठा करण्यात आला आहे. ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर गाझामध्ये हजारो हवाई हल्ले करण्यात आले असून, दाट लोकवस्तीच्या भागात २३०० हून अधिक लोक मारले गेले आहेत.
"दहशतवाद्यांनी मला गोळ्या घातल्या..."दरम्यान, हल्ल्यादरम्यान तरुणी म्हणते, "हमासच्या दहशतवाद्यांनी मला गोळ्या घातल्या आहेत… शिमन, माझा जीव जातोय…आय लव्ह यू." तरुणीचा आवाज ऐकल्यावर ती खूप घाबरली होती. इस्रायली सरकारने हमासच्या हल्ल्यांच्या वेदनादायक घटना यापूर्वीच शेअर केल्या आहेत. हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायली नागरिकांवर काय केले आणि त्यांच्यावर कोणते क्रौर्य ओढवले, हे जगाला सांगितले जात आहे. हमासच्या हल्ल्यात १३०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर इस्रायलच्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत २३०० पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.